जळगावात बस नदीत कोसळून दोघांचा मृत्यू   

जळगाव : इंदूरवरुन जळगावकडे जाणारी खासगी बस फैजपूर-अमोदा मार्गावरील मोर नदीच्या पुलावरून खाली कोसळली. या नदीमध्ये पाणी नसल्याने  बस नदीत पलटी झाली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. 
 
अपघातग्रस्त बस यावल तालुक्यातील फैजपूर-अमोदा मार्गावरून भुसावळच्या दिशेने येत होती. आमोदा गावाजवळील मोर नदीवरील पुलावरुन जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलाचा कठडा तोडून थेट १५ फूल खोल नदीपात्रात कोसळली. दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य २५ प्रवाशी गंभीर जखमी झाले. बस नदीत कोसळल्याची माहिती मिळताच गावातील नागरिक आणि पोलिसांनी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यास सुरवात केली. 
 
जखमी प्रवाशांना जवळच असलेल्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. दरम्यान, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे फैजपूर-अमोदा मार्गावर अनेकदा अपघात घडत आहेत. आमोदा गावाजवळील मोरनदीवरील पूलाच्या भागातील अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
 

Related Articles