नीरज चोप्राला पुन्हा विजेतेपद   

बंगळुरू : भारताचा स्टार असलेला ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने शनिवारी विश्व दर्जाच्या स्पर्धेचे आयोजन करण्याचे स्वप्न साकारताना  येथे झालेल्या एनसी क्लासिक भालाफेकीत जेतेपदाचा मान मिळविला. दोन ऑलिम्पिक पदकाचा मानकरी असलेल्या 27 वर्षांच्या नीरजने आई-वडिलांच्या उपस्थितीत कांतीरेवा स्टेडियममध्ये तिसर्‍या प्रयत्नात 86.18 मीटर अंतरासह विजेता होण्याचा मान मिळविला. 
 
नीरजचे हे सलग तिसरे जेतेपद आहे. याआधी त्याने 20 जून रोजी पॅरिस डायमंड लीग आणि 24 जून रोजी पोलंडच्या ओस्ट्रावा येथे झालेल्या गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजेतेपद पटकाविले होते. केनियाचा 2025 चा विश्वविजेता ज्युलियस येगो याने 84.51 मीटर फेकीसह दुसरे स्थान पटकावले. श्रीलंकेचा रूमेश पथिरगे (84.34 मीटर) तिसर्‍या स्थानी राहिला. नीरजने जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सच्या सहकार्याने हे आयोजन केले.
 
आयोजनाला भारतीय थलेटिक्स महासंघाने मान्यता दिली होती. स्पर्धेत 7 आंतरराष्ट्रीय आणि 5 भारतीय, असे 12 भालाफेकपटू सहभागी झाले. या स्पर्धेला विश्व थलेटिक्सने अ दर्जा बहाल केला आहे. नीरजने यंदा मे महिन्यात 90 मीटरचा अडथळा पार केला होता. त्यानंतर ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक 2025 मध्ये त्याने 85.29 मीटर अशा सर्वाोत्कृष्ट फेकीसह विजेतेपदाचा मान मिळविला होता.

Related Articles