वैभव सूर्यवंशीचे सर्वात जलद शतक   

लंडन : वैभव सूर्यवंशीने इंग्लंड दौर्‍यातील चौथ्या एकदिवसाच्या सामन्यात 19 वर्षाखालील क्रिकेटमधील सर्वात जलद शतकी खेळी करत नवा ऐतिहासिक कामगिरी केली  आहे.  वॉर्सेस्टरच्या मैदानात इंग्लंड 19 वर्षाखालील संघाविरुद्ध भारत 19 वर्षाखालील  संघाच्या डावाची सुरुवात करताना वैभव सूर्यंवशीने 12 वर्षांपूर्वीच्या विक्रमाला सुरुंग लावला. त्याने पाकिस्तानच्या फलंदाजाचा विक्रम मोडीत काढला. भारतीय 19 वर्षाखालील संघाकडून खेळताना वैभव सूर्यंवशी याने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या वनडेत 52 चेंडूत शतक झळकावले. याआधी 19 वर्षाखालील सर्वात जलद शतकी खेळीचा रेकॉर्ड हा पाकिस्तानच्या कामराम गुलामच्या नावे होता. त्याने 53 चेंडूत शतक ठोकले होते. वैभव सूर्यंवशीनं आपल्या वादळी खेळीत 10 चौकार आणि 7 षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. या खेळीसह 19 वर्षाखालील सर्वात जलद शतकी खेळीचा विक्रम आता भारतीय युवा बॅटरच्या नावे झाला आहे.
 
मागील वर्षी 14 वर्षीय वैभव सूर्यंवशी याने चेन्नईच्या मैदानात ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाविरुद्ध मेन्स यूथ टेस्टमध्ये दुसरे सर्वात जलद शतक झळकवण्याचा पराक्रम केला होता. कसोटीत त्याच्या नावे 56 चेंडूत शतक झळकवल्याचा रेकॉर्ड आहे. 19 वर्षाखालील  कसोटीत सर्वात जलद शतक झळकवण्याचा रेकॉर्ड हा इंग्लंडच्या मोईन अलीच्या नावे आहे. त्याने 2005 मध्ये 56 चेंडूत शतक झळकावले होते. वैभव सूर्यंवशीनं इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात 78 चेंडूत 13 चौकार आणि 10 षटकाराच्या मदतीने 143 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय विहान मल्होत्रानं 121 चेंडूत 15 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 129 धावा ठोकल्या. या दोन शतकांच्या जोरावर भारतीय 19 वर्षाखालील  संघानं निर्धारित 50 षटकात 9 बळीच्या मोबदल्यात 363 धावा केल्या आहेत.
 
19 वर्षाखालील जलद शतकी खेळी करणारे फलंदाज
 
52 चेंडू - वैभव सूर्यवंशी - भारत ण19 विरुद्ध इंग्लंड 19 - वॉर्सेस्टर (2025)
53 चेंडू - कामरान गुलाम - पाकिस्तान अंडर 19 विरुद्ध इंग्लंड अंडर 19 - लीसेस्टर (2013)
68 चेंडू - तमीम इक्बाल - बांग्लादेश अंडर 19 विरुद्ध इंग्लंड अंडर 19 - फतुल्लाह (2005/06)
69 चेंडू - राज अंगद बावा - भारत 19 विरुद्ध युगांडा 19 - तारौबा (2021/22)
69 चेंडू - शॉन मार्श - ऑस्ट्रेलिया अंडर 19 विरुद्ध केनिया अंडर 19 - डुनेडिन (2001/02)

Related Articles