स्वयंवर झाले सीतेचे...   

भावार्थ रामायणातील कथा

विलास सूर्यकांत अत्रे 
 
परशुराम विष्णूचा एक अवतार आहे. शिवाने आपले धनुष्य सहस्त्रार्जुनाच्या वधासाठी परशुरामाला दिले होते. ते कार्य करून फिरता फिरता परशुराम आपल्या सोबत असलेल्या ऋषीमुनींसह जनकाच्या मिथिला नगरीत आले. परशुराम आल्याची माहिती जनकाला समजताच त्याने परशुरामांचे स्वागत केले. जनकाने अत्यंत आदराने परशुरामांना भोजनासाठी आपल्या महाली नेले. परशुरामांनी शिवधनुष्य बाजूला ठेवले. सर्व ऋषीमुनींसह ते भोजनाला बसले. अतिशय सुमधुर अन्नाच्या वासानेच सगळ्यांचे मन तृप्त आले. 
 
परशुराम आणि ऋषीमुनी जेवणास बसलेले असताना बाल सीतेने ते शिवधनुष्य पाहिले. बालसुलभ मनाने तिने त्या धनुष्याचा घोडा केला. धनुष्याच्या प्रत्यंचेचा चाबुक केला आणि राजभवनात ती घोडाघोडा खेळू लागली. धनुष्याच्या केलेल्या घोड्यावरून इकडे तिकडे धावताना ती राजभवनाच्या बाहेर आली आणि राजमार्गावरुनही धावत सुटली.
 
ऋषीमुनींची जेवणे झाली, त्यांना निघायचे होते. शिवधनुष्य घेण्यासाठी परशुराम गेले असता, तिथे बघतो तो काय जागेवर धनुष्य नव्हते. शिवधनुष्य चोरीला गेले असावे, असे त्यांना वाटले; पण शिवधनुष्य खूप वजनदार होते, हे धनुष्य बर्‍याच माणसांनाही पेलता येण्यासारखे नव्हते. त्यामुळे जनकाकडेच कोणीतरी असा शक्तीशाली माणूस असेल, असे परशुरामांना वाटले. जनकावर तो संतापला. जनक स्वत: धनुष्याचा शोध घेऊ लागला. शोघ घेताघेता तो अंगणात आला. त्याच्या लक्षात आले, की धनुष्य ओढत नेले तरच अशी रेघ उमटेल. त्या रेघेचा मागोवा घेत जनक चालला असताना त्या धनुष्याचा घोडाघोडा करून राजरस्त्यावर खेळत असलेल्या सीतेला त्याने पाहिले. धनुष्य मिळाल्याचा त्याला आनंद झाला. सीतेला पाहून त्याने सीतेला हाकावर हाका मारल्या. वडिलांच्या आवाजाने घाबरून जाऊन सीतेने ते धनुष्य जमिनीवर टाकून दिले. जनक ते धनुष्य घेऊन जाण्यासाठी उचलू लागला, तर त्याला उचलता आले नाही.
 
त्याने सीतेला पोटाशी धरले आणि सीतेला सांगितले, तू धनुष्याचा केलेला घोडा चालवत माझ्या बरोबर ये, सीतेला आनंद झाला. शिवधनुष्याचा घोडा नाचवत नाचवत ती परशुरामांपुढे आली. ते पाहून परशुराम आश्चर्यचकीत झाले. सीता ही आदिशक्ती असल्याचे त्यांना समजले. हिचा पती प्रत्यक्ष अवतारी पुरूषच असणार. हे धनुष्य तोच पेलू शकेल आणि त्याला प्रत्यंचाही लावू शकेल.
 
आदिशक्तीचा अवतार
 
परशुरामांनी सीतेचे स्वयंवर कसे करावे याच्या सूचना जनकाला दिल्या. सीता ही आदिशक्तीचा अवतार आहे. आदिपुरूषच हिचा वर होऊ शकेल आणि त्यासाठी जो कोणी शुरवीर या धनुष्याला प्रत्यंचा लावेल, त्यालाच सीता वरमाला घालील हा ‘पण‘ ठेवण्यास त्याने जनकाला सांगितले आणि सीता स्वयंवरासाठी आपले शिवधनुष्य जनकाला दिले.
 
सीता वयात येताच, परशुरामांच्या सांगण्याप्रमाणे जनकाने सीतेचे स्वयंवर जाहीर केले, तसे मिथिला नगरीत अनेक राजे, तपस्वी, यक्ष, गंधर्व, किन्नर, राक्षस, दैत्य स्वयंवरासाठी आले. दागिन्यांनी सजलेल्या रुपसुंदर सीतेला हत्तीवरून मंडपात आणले गेले. सीता मंडपात आली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या. जनकाने प्रधानाला शिवधनुष्य ठेवलेली पेटी  आणण्यास सांगितले. अनेक महावीरांच्या मदतीने ती पेटी ओढत ओढत लग्नमंडपात आणली गेली. शिवधनुष्य बाहेर काढून ठेवले गेले. जनक पुढे आला आणि शिवधनुष्याकडे हात दाखवत तो म्हणाला, ‘हे शिवधनुष्य आहे याच शिवधनुष्याने त्रिपुरा राक्षसाचा वध शंकराने केला होता. याच शिवधनुष्याने परशुरामाने सहस्त्रार्जुनाचा वध केला होता. सीतेच्या स्वयंवरासाठी या शिवधनुष्याला प्रत्यंचा लावण्याचा ‘पण‘ ठेवलेला आहे. जो या शिवधनुष्याला प्रत्यंचा लावेल त्या सामर्थ्यवान पुरुषाला सीता वरमाला घालील‘. 
 
पण कोण जिंकणार?
 
स्वयंवरासाठी आलेल्या राजांना शिवधनुष्य पाहूनच धडकी भरली. प्रत्येकाला समजून आले की, ‘पण‘ ऐकायला साधा वाटतो; पण पूर्तता करायला अतिशय अवघड आहे. त्याच वेळी विवाह मंडपात रावणाचे आगमन झाले. त्याला येताना पाहूनच अनेक राजांना भयाने कंप सुटला, देव दानवांना त्याच्या येण्याचा धाक बसला, जनक साशंकित झाला. रावणाने आल्या आल्या ‘पण‘ काय ठेवला आहे याची चौकशी केली. शिवधनुष्याला प्रत्यंचा लावणे हा ‘पण‘ असल्याचे त्याला समजले. हा ‘पण‘ त्याच्यासाठी किरकोळ होता. सीतेच्या प्राप्तीसाठी प्रसंगी महायुद्धही करीन हा ‘पण‘ तर सहज जिंकेन असे गर्वाने जोरजोरात ओरडत तो शिवधनुष्याला प्रत्यंचा लावण्यासाठी पुढे सरसावला. पणाच्या पूर्ततेसाठी रावण आलेला पाहून सीतेच्या मनात भीतीची पाल चुकचुकली. प्रत्यंचा लावण्यासाठी रावणाला हे धनुष्यच उचलताच येऊ नये, अशी शिवाची प्रार्थना तिने केली. धनुष्य उचलताना रावणाला जमिनीवर जोर द्यावा लागेल, त्यावेळी त्याला जमिनीवर जोर लावताच येऊ नये. तो जोर लावत असताना रावणाला धरणीने रसातळी न्यावे, अशी सीतेने धरणीमातेकडे प्रार्थना केली. कंकाळी ही सीतेची कुलदेवता. कुलदेवतेचीही प्रार्थना सीतेने केली. सीता ही आदिमाता, आदिशक्ती. तिची विनवणी सगळ्यांनीच ऐकली. शिव मनात म्हणाला, राम हा माझा स्वामी आहे. सीता ही माझ्या स्वामींची कांता आहे, ती रावणाच्या हाती कशी लागू देईन? त्यासाठी शिव आपले गण घेऊन धनुष्याजवळ आला आणि या सार्‍या शक्तींनी धनुष्यात प्रवेश केला.
 
रावण गलितगात्र
 
गर्वाने उन्मत्त झालेला रावण प्रत्यंचा लावण्यासाठी ते धनुष्य उचलण्यास गेला. हसत हसत तो धनुष्य उचलण्यासाठी वाकला. एका हाताने ते उचलू असे त्याला वाटले होते. एका हातानेच तो धनुष्य उचलू पहात होता. सहजपणे त्याला धनुष्य उचलता आले नाही. म्हणून त्याने आपली सगळी ताकद लावली. तरीही त्याला धनुष्य हलवता आले नाही. धनुष्य उभे करीत असताना धनुष्याच्या वजनाने रावणाला आपला तोल सांभाळता आला नाही. त्याला स्वत:चा तोल सावरता आला नाही. परिणामी तो धाडदिशी धरणीवर आडवा पडला आणि त्याच्या अंगावर शिवधनुष्य पडले. शिवधनुष्याच्या वजनाखाली तो पार दबून गेला. सगळी इंद्रिये गलितगात्र झाली.
 
रावणाची दयनीय अवस्था पाहून सीतेला आनंद झाला. जनकाचा प्रधान रावणाच्या मदतीला धावून गेला. प्रधान धनुष्य बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागला; पण प्रधानाला ते शक्य झाले नाही. जनकाकडे पहात तो जनकाला म्हणाला, ‘माझ्या अंगावरील हे धनुष्य मला सहन होत नाही, ते आधी दूर कर. नाहीतर ते आता माझा जीव घेईल. माझा जीव गेला तर त्याचे परिणाम भयंकर होतील. इंद्रजीत आणि कुंभकर्ण ही माझी मुले आहेत. जनका ते तुझा सर्वनाश करतील. ते तुझ्या कुळाचे निर्दालन करतील. तुझ्या राज्याची राखरांगोळी करतील.‘ जनकाने रावणाच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. आपल्याकडे आलेल्या रावणाची ही दशा पाहून जनकाला त्याची दया आली. तो धावत रावणापाशी गेला आणि सहजपणे धनुष्य वरचेवर उचलून बाजूला केले. जनकाने रावणाला उठवून त्याच्या आसनावर नेऊन बसविले.
 
रावणाचे विघ्न टळल्यामुळे सीता सुखावली. तिने मनोमन रामाला वरले होते. रावणासारख्या धिप्पाड माणसाला हे धनुष्य साधे उचलता आले नाही, ते सुकुमार कोवळा राम कसे करू शकेल? आपल्या पित्याने अतिशय अवघड ‘पण‘ ठेवला. आता कसे होणार या चिंतेने सीतेला ग्रासले. या लावलेल्या पणाबद्दल जनकाची मनस्थितीही अशीच सीतेसारखी झाली होती.
 
जनकाने सभेकडे एकवार पाहिले. सगळेच दिग:मुढ होऊन बसले होते. या सगळ्यांकडे पहात उद्वेगाने काही शब्द जनकाच्या मुखातून बाहेर पडले. तो म्हणाला, ‘शिवचापाला प्रत्यंचा लावेल असा कुणीच वीर पुरूष इथे नाही का? या शिवधनुष्याला प्रत्यंचा लावणारा कोणीच मर्द इथे नाही का‘? ‘वीर पुरूष इथे कुणीच नाही का‘ हे जनकाचे शब्द रामाला सहन झाले नाहीत. तो त्याच्या पुरूर्षाथाचा अपमान होता, ते शब्द ऐकून धनुष्याला प्रत्यंचा लावण्याच्या उद्देशाने राम जागेवरून उठला. तो विश्वामित्रांपाशी गेला. त्यांना वंदन करून धनुष्याला प्रत्यंचा लावण्याची परवानगी त्याने विश्वामित्रांकडे मागितली. रामाची विनंती ऐकून विश्वामित्र प्रसन्न झाले. त्यांनी रामाला आशीर्वाद दिले आणि त्याने शिवचापाला प्रत्यंचा लावण्याची आज्ञा केली.
 
अतिशय नम्र भावनेने रामाने धनुष्याला वंदन केले. हे धनुष्य शिवाने हाताळले होते. हे धनुष्य वजनामुळे जड झाले नव्हते, त्या धनुष्यात जडपणा असा भरून राहिला नव्हता, तर ती शिवशक्ती होती. त्या धनुष्याने अनेक दुष्टांचे निर्दालन केले होते. त्या धनुष्याने खूप तप केले होते. म्हणून ते शिवहस्ते पवित्र झाले होते. राम सदैव शिवाचे ध्यान करतो, तर शिव सदैव रामचरणांना वंदन करतो. त्या धनुष्याची अशी भावना झाली, की शिवामुळे मी पवित्र झालो, तर रामामुळे मला मुक्ती मिळेल. रामाच्या चरणस्पर्शाने शिळा उद्धरली जाते, तर हस्तस्पर्शाने कोणाचेही जडत्व नष्ट होईल. धनुष्याला प्रत्यंचा लावण्यासाठी रामाने एका हातानेच धनुष्याची दोरी ओढून ती धनुष्याला लावण्यासाठी त्याने धनुष्य सहजपणे वाकवले. प्रत्यंचा लावण्यासाठी राम धनुष्य वाकवत असताना, अतिशय मोठा कडकडाट होऊन ते धनुष्य मधोमध भंगले, त्याचे दोन भाग झाले. त्या कडकडाटाने संपूर्ण आसमंत दुमदुमला. जनकाला परमानंद झाला. रामासारखा जामात मिळाला तो केवळ विश्वामित्रांमुळे या जाणिवेने विश्वामित्रांचे तो गुणगान करीत राहिला. अधिर झालेल्या सीतेने स्वयंवराची माळ रामाच्या 
गळ्यात घातली.
 
(आधार संत एकनाथकृत भावार्थ रामायण बालकांड अध्याय १८ ते २०)

Related Articles