वाचक लिहितात   

आक्षेपांचे खंडण करावे
 
मतदार वाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला जे अभूतपूर्व यश मिळाले, त्याची कारणमीमांसा देताना, महायुतीतील सर्वांनी एकमुखाने सांगितले की, ही सर्व लाडकी बहीण योजनेची परिणीती आहे. आम्ही आमच्या बहिणींना महिना रु १५०० देण्याचे कबुल केले होते. त्यानुसार त्या बहिणींनी खाल्ल्या मिठाला जागून, मतदान केले असे त्यांचे म्हणणे आहे. एकीकडे सत्ताधारी पक्ष हा दावा करत आहेत, तर दुसरीकडे विरोधक हे शक्य नसून, मतदान यंत्राद्वारे काहीतरी गडबड करून, सत्ताधारी पक्षाने निवडणूक जिंकली असल्याचा आरोप करत आहेत. त्यांच्या आरोपात तथ्य आहे, हे नाकारता येत नाही. हे खालील गोष्टीवरून दिसून येते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करणे, हे निवडणूक आयोगाचे काम आहे.  
 
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई
 
देशी वृक्षांची लागवड करा
 
गेल्या काही वर्षात शहरात सिमेंटच्या जंगलाने गर्दी केली आहे. मोठमोठ्या इमारती व टॉवर्स उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली; मात्र वृक्षतोड करण्यात आली तितक्या प्रमाणात वृक्ष लागवड झालेली नाही, त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले. त्याचा परिणाम तपमानवाढीवर झाला. बेसुमार वृक्षतोडीमुळे अनियमित पाऊस, उष्णता अशा संकटांना तोंड द्यावे लागले. यावर मात करण्यासाठी सर्व स्तरातून वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येते. यात विदेशी वृक्षांचीच अधिक लागवड केली जाते. विदेशी वृक्षांमुळे जैव विविधता नष्ट होते. देशी वृक्ष आपल्या परिसरात पर्यावरणाचा समतोल साधतात. देशी वृक्ष औषधीही असतात, शिवाय त्याची दाट सावलीही मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त देशी वृक्षांची लागवड करायला हवी.
 
श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे.
 
शिक्षण क्षेत्रातील कामगिरी
 
जागतिक स्तरावर भारताच्या शैक्षणिक क्षेत्राने केलेली कामगिरी ही अभूतपूर्व अशीच म्हणावी लागेल. जगभरातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील ५४ संस्थांचा नुकताच समावेश झाला. हे यश नव्या शैक्षणिक धोरणाचे, कौशल्य विकासाच्या दिशेने घेतलेल्या दूरदृष्टीपूर्वक निर्णयांचेच आहे. जगभरात मान्यताप्राप्त ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२५’ मध्ये यंदा भारतातील तब्बल ५४ शैक्षणिक संस्थांचा समावेश झाला आहे. हे केवळ संख्यात्मक नाही, तर गुणवत्तेच्या दृष्टीने मोलाचे यश मानले पाहिजे.
 
राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव
 
अघोषित आणीबाणीच
 
२५ जून १९७५ रोजी जाहीर झालेली आणीबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा अध्याय मानला जातो. दरवर्षी भाजपसारख्या पक्षांकडून या दिवसाची जाणीवपूर्वक आठवण करून दिली जाते. इंदिरा गांधींच्या निर्णयावर टीका केली जाते. लोकशाहीची गळचेपी, विरोधकांची मुस्कटदाबी आणि माध्यमांवरील सेन्सॉरशिप या गोष्टी पुन्हा-पुन्हा अधोरेखित केल्या जातात. मात्र प्रश्न असा आहे की, आज, जवळपास पन्नास वर्षांनंतर या आणीबाणीची आठवण करून देणारे सत्तेवर असताना, त्यांच्या कार्यशैलीतच आपण तीच ‘अनधिकृत आणीबाणी’ अनुभवत आहोत, असे का वाटते? आज विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर सर्रासपणे होताना दिसतो. कुणावर ईडी, कुणावर सीबीआय, कुणावर आयकर विभागाच्या छापेमार्‍या. प्रसारमाध्यमे काही थेट खरेदी केली गेली आहेत, तर काहींना सरकारी जाहिरातींच्या गाजराने वश करण्यात आले आहे. विरोधी पक्ष फोडणे, आमदारांची ‘खरेदी’, बहुमत असलेल्या सरकारांना अल्पमतात आणणे या गोष्टी आता सर्रास घडतात, ही देखील एक आणीबाणीच ठरत नाही का?
 
दीपक गुंडये, वरळी.
 
भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण!
 
२५ जून रोजी भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह अमेरिकेचे मिशन कमांडर पेगी व्हिटसन, पोलंडचे मिशन स्पेशालिस्ट स्लाव्होज उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे मिशन स्पेशालिस्ट टिबोर कापू या अंतराळवीरांना घेऊन अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील ’नासा’च्या केनेडी स्पेस सेंटरमधून क्सिऑम-४ मिशन मोहिमेअंतर्गत स्पेसएक्सचे फाल्कन ९ रॉकेट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) जाण्यासाठी झेपावले. भारताच्या अंतराळ इतिहासात एक नवीन यशोदायी अध्याय जोडला गेला. पहिले भारतीय अंतराळवीर विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या यशस्वी अंतराळ मोहिमेनंतर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाऊल ठेवणारे ते पहिले भारतीय असतील. शुभांशु शुक्लांची अंतराळातील झेप ही समस्त भारतीयांसाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण ठरली असून भविष्यकाळातील भारतीय अंतराळ विज्ञानाच्या यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई

Related Articles