टेक्सासमध्ये महापूर; ५२ जणांचा मृत्यू   

 

२७ बेपत्ता मुलींचा शोध सुरू
 
वॉशिंग्टन : अमेरिकेतील टेक्सास राज्यात मागील दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ग्वाडालुपे नदीला महापूर आला असून, या पुरामुळे आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २७ मुली बेपत्ता आहेत.
 
ग्वाडालुपे नदीजवळील मुलींच्या उन्हाळी शिबिराला या पुराचा फटका बसला.  नदीची पाणी पातळी केवळ ४५ मिनिटांत २६ फूट उंचावली आणि घरे आणि वाहने वाहून गेली. यात उन्हाळी शिबिरातील ७५० मुलींना वाचविण्यात यश आले. मात्र, २७ मुली वाहून गेल्याची भीती आहे. या बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी नऊ बचाव पथके, १४ हेलिकॉप्टर आणि १२ ड्रोनचा वापर केला जात आहे. 
 
हवामान खात्याने केवळ मध्यम पावसाचा इशारा दिला होता. अतिवृष्टी होईल, याचा अंदाज वर्तवलेला नव्हता. त्यामुळे लोकांना वेळेत सावध करता आले नाही. अचानक आलेल्या पुराचा धोका अजूनही कायम असल्याचे आता हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अ‍ॅबॉट यांनी पूर परिस्थिती लक्षात घेता आणीबाणीची स्थिती कायम ठेवली आहे. अमेरिकेचे  अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपत्ती जाहीर करण्याची विनंती त्यांनी केली आहे. या घोषणेमुळे केंद्र सरकारकडून पूरग्रस्तांना मदत मिळू शकते.
 
टेक्सासमधील सॅन अँटोनियोच्या आसपास मुसळधार पावसात १,००० हून अधिक बचाव कर्मचारी बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. पुरामुळे वीज तारा कोसळल्या आणि केर्विलच्या आसपासच्या भागातील जवळपास २ हजार ६०० घरांमधील वीज खंडीत झाली आहे.दरम्यान, हवामान विभागातील हजारो कर्मचार्‍यांना सरकारने कामावरून काढून टाकले आहे. 
 

Related Articles