मस्क यांचा नवा पक्ष   

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती अ‍ॅलन मस्क यांनी नवा पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा रविवारी केली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत विविध विषयांवर मतभेद झाल्यानंतर त्यांनी पक्ष स्थापन करत असल्याची औपचारिक घोषणा केली. त्याद्वारे अमेरिकन नागरिकांना पुन्हा स्वातंत्र्य देत असल्याचे आश्वासनही दिले
 
देशातील दोन पक्षीय यंत्रणेला आव्हान देण्यासाठी अमेरिका पार्टी, या नावाचा पक्ष स्थापन करत असल्याची पोस्ट त्यांनी एक्सवर टाकली. आज अमेरिका पार्टी स्थापन केली आहे. त्याद्वारे तुम्हाला स्वातंत्र्य दिले जाईल. देशात अनावश्यक खर्च वाढला असून भ्रष्टाचार बोकाळला आहे,. त्यामुळे देश दिवाळखोरकडे वाटचाल करत आहे. हुकूमशाहीच्या वातावरणात आपण राहात असून ही लोकशाही नाही, असे नमूद केले. 
 
पक्षाची नोंदणी झाली आहे की नाही, याबाबत त्यांनी काही सांगितले नाही. मात्र, कायदेशीरदृष्ट्या पाहता त्यांना पक्षाची नोंदणी निवडणूक आयोगाकडे करावी लागणार आहे. 
निवडणूक आयोगाकडे सध्य तरी कोणत्याही नव्या पक्षाची नोंद नाही, असे वृत्त सीएनएनने दिले. दरम्यान, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मतभेद सार्वजनिकरीत्या उघड झाल्यानंतर मस्क यांनी नवीन पक्ष स्थापन करत असल्याचे संकेत दिले होेते. तसेच ट्रम्प यांच्या सरकारपासून काडीमोड घेत कार्यक्षमता विभागातून अंग काढून घेतले होते. तत्पूर्वी सार्वजनिक व्यासपीठांवर अनेक विषयावर ट्रम्प यांच्याशी मतभेद उघड झाले होते. 
 
याच काळात त्यांनी एक्सवर पोस्ट टाकत नागरिकांना प्रश्न विचारला होता की, तुम्हाला देशात एखादा नवा पक्ष हवा आहे का ? या संदर्भात त्यांनी जनमत चाचणी देखील घेतली होती. त्यांनी लिहिले दोन एकच्या गुणांकाने तुम्हाला नवा पक्ष हवा असेल तर तो तुम्हाला मिळेल. 
 
२०२४ मध्ये अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. डोनाल्ड ट्रम्प यांना मस्क यांनी संपूर्ण पाठिबा देण्याबरोबर प्रचारासाठी मोठ्या देणग्याही दिल्या होत्या. यानंतर ट्रम्प यांच्या प्रशासनात त्यांना स्थान दिले होते. त्यासाठी खास सरकारी कार्यक्षमता विभागही तयार केला होता. त्याचे ते प्रमुख बनले होते. यानंतर सरकारी खर्चात अनावश्यक खर्चात कपात करण्याबरोबर अमेरिकेतून विविध देशांतील अशासकीय संस्थांचा निधी रोखण्याचा सपाटा लावला होता. 
 
नुकतेच मंजूर झालेले ट्रम यांच्या बिग अँड ब्यूटीफूल विधेयकावर टीका केली होती. कर आणि खर्चासंदर्भातील विधेयकामुळे वित्तीय तुटीमध्ये तीन ट्रिलियन डॉलरची भर पडेल, असे ते म्हणाले होते. अल्प मताने विधेयक मंजूर झाल्यामुळे ट्रम्प आणि मस्क यांच्यातील दरी अधिक रुंदावत गेली.

आर्थिक नाड्या आवळण्यास सुरूवात

मतभेद उफाळून आल्यानंतर आणि मस्क नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे समजताच ट्रम्प यांनी मस्क यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरूवात केली. त्या अंतर्गत मस्क यांच्या कंपन्यांना दिली जाणारी कंत्राटे रद्द करण्यासाठी विचार सुरू केला. मस्क यांच्यावर टीका करताना सांगितले की, सरकारी कार्यक्षमता विभागाचा आता राक्षस झाला असून तो उलटून आता मस्क यांना गिळंकृत करण्याची शक्यता आहे. 

दोनच पक्ष आलटून पालटून सत्तेवर

अमेरिकेत डेमोक्रॅटीक आणि रिपब्लिक पक्ष हे दोनच पक्ष आहेत. आलटून पालटून ते सत्तेवर येतात. दोन्ही पक्षांच्या सदस्यांची संख्या मोठी आहे. गेल्या १०० वर्षात तिसरा पक्ष स्थापन करण्याचे प्रयत्नही झाले. मात्र, ते अयशस्वी ठरले. या पार्श्वभूमीवर मस्क यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष पुढील वर्षी होणार्‍या मध्यवर्ती निवडणुकीत सिनेट आणि हाऊससाठी इच्छूक काही उमेदवारांना पाठिंबा देणार आहे. 
 

 

Related Articles