मंगळग्रहाच्या उल्कापिंडाचा न्यूयॉर्कमध्ये होणार लिलाव   

न्यूयॉर्क : मंगळग्रहावरून पृथ्वीवर आलेल्या एनडब्ल्यूए १६७८८ या सर्वात मोठ्या उल्कापिंडाचा १६ जुलै रोजी न्यूयॉर्कमधील सॉथबीज येथे लिलाव होणार आहे. नायजरमध्ये सापडलेला २४.६७ किलो वजनाचा एक मंगळ ग्रहाचा उल्कापिंड अंदाजे ४ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास ३३ कोटी रुपयांना विकला जाऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
 
नोव्हेंबर २०२३ मध्ये नायजरच्या अगाडेझ प्रदेशात एका शिकार्‍याला हा दुर्मिळ उल्कापिंड आढळला होता. हा प्रदेश अंतराळ खडकांपेक्षा डायनासोरच्या जीवाश्मांसाठी अधिक ओळखला जातो. शांघाय खगोलशास्त्र संग्रहालयात या उल्कापिंडाचा एक नमुना पाठवण्यात आला, तिथे हा मंगळ ग्रहाचा खडक असल्याची पुष्टी झाली. एनडब्ल्यूए १६७८८ हा लालसर-तपकिरी रंगाच्या फ्यूजन क्रस्टने झाकलेला आहे. पृथ्वीच्या वातावरणातून जलद उतरताना घर्षणाच्या उष्णतेमुळे तयार झालेल्या खाचाखोचा उल्कापिंडाच्या पृष्ठभागावर दिसतात.
 
हा खडक मंगळ ग्रहावर एका प्रचंड उल्कापिंडाच्या धडकेत उडून अंतराळात फेकला गेला आणि १४ कोटी मैलांचे अंतर पार करून शेवटी सहारा वाळवंटात येऊन आदळला. त्यावरील तांबट रंगाची ’फ्यूजन क्रस्ट’ ही त्याच्या अंतराळयात्रेची साक्ष आहे. हा खडक अगदी नवीन आहे. त्यामुळे त्याचे रासायनिक गुणधर्म जवळपास अपरिवर्तित राहिले आहेत. ते एक प्रकारचे काचेसारखे खनिज आहे.

Related Articles