नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक   

नवी दिल्ली : फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी याचा धाकटा भाऊ नेहाल यास अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) विनंतीवरुन अमेरिकन अधिकार्‍यांनी अटक केली आहे.नेहाल याला शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले, असे अमेरिकन अधिकार्‍यांनी भारतास कळवलेॠ या प्रकरणातील पुढील सुनावणी १७ जुलै रोजी आहे. त्या दिवशी नेहाल जामीन मागू शकतो. पण, त्यास विरोध केला जाईल, असेही अमेरिकन अधिकार्‍यांनी सांगितले.नेहाल यास भारताकडे सोपविण्यात यावे, अशी संयुक्त मागणी ईडी आणि सीबीआयने अमेरिकेकडे केली होती. त्यावरुन हे पाऊल उचलण्यात आले. आता यासंदर्भातील प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.
 
आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ च्या कलम ३ अंतर्गत आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-बी (गुन्हेगारी कट) आणि २०१ (गायब होणे) अंतर्गत नेहाल याच्यावर कारवाई होणार आहे. नेहाल हा पंजाब नॅशनल बँकेशी संबंधित १३ हजार कोटींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपींपैकी एक आहे. नीरव, नेहाल आणि त्यांचा चुलता मेहुल चोक्सी हे या प्रकरणातील आरोपी आहेत. भारताच्या विनंतीवरुन नीरव याला सोपविण्याची प्रक्रिया अमेरिकेत सुरु आहे. नेहाल याने नीरव याच्या मदतीने काळा पैसा मोठ्या प्रमाणात परदेशात पाठविल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात नेहाल याचे नाव आहे. त्याच्यावर पुरावे नष्ट करण्याचा आणि नीरव याला मदत केल्याचा आरोप आहे. पीएनबी गैरव्यवहार देशातील सर्वांत मोठ्या गैरव्यवहारांपैकी एक मानला जातो. 

Related Articles