शस्त्रास्त्र व्यापारी भंडारी फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित   

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये सध्या वास्तव्यास असलेला  शस्त्रास्त्र सल्लागार संजय भंडारी याला येथील न्यायालयाने शनिवारी फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.२०१८ च्या आर्थिक गुन्हेगार कायद्याच्या तरतुदींनुसार न्यायालयाने हा आदेश जारी केला, असे त्यांनी सांगितले. हा आदेश अमलबजावणी संचालनालयाला (ईडी) मोठा दिलासा देणारा ठरला आहे. आता ईडी भंडारी याची कोट्यवधीची मालमत्ता जप्त करु शकतात.
 
भंडारी याला भारताकडे सोपविण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, ब्रिटनमधील न्यायालयाने ती फेटाळून लावली होती. त्यामुळे भंडारी हा आता भारताच्या ताब्यात मिळण्याची आशा जवळपास संपुष्टात आली आहे. २०१६ मध्ये प्राप्तिकर विभागाने दिल्लीत छापा घातल्यानंतर भंडारी हा ब्रिटनला पळून गेला होता. काळ्या पैशाविरोधी कायद्यांतर्गत प्राप्तिकर विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत ईडीने फेब्रुवारी २०१७ मध्ये भंडारी आणि इतरांविरुद्ध आर्थिक अफरातफर प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) फौजदारी खटला दाखल केला होता. ईडीने २०२० मध्ये त्याच्याविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले. ईडीला संशय आहे की भंडारी यांनी यूपीए राजवटीत संरक्षण करारांद्वारे मिळवलेल्या बेकायदेशीर निधीचा वापर परदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला होता. 

Related Articles