मूसेवाला यांची हत्या करणार्‍याचा भाऊ ठार   

तिघा हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

अमृतसर : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येत सहभागी असणार्‍या हल्लेखोरांपैकी एकाच्या भावाची तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले.जुगराज सिंह असे त्याचे नाव आहे. अमृतसरच्या मेहता ठाण्याच्या हद्दीतील चंदनके गावात सिंह यास  दिवसाढवळ्या अगदी जवळून गोळ्या घालून ठार मारण्यात आले. जुगराज हा मुसेवाला यांची हत्या करणार्‍या जगरुप सिंह उर्फ रुप याचा भाऊ आहे. जगरुप आणि दुसरा शूटर मनप्रीत सिंग जुलै २०२२ मध्ये पंजाब पोलिसांबरोबरील चकमकीत ठार झाले होते.
 
मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या जुगराजवर गोळीबार केला, असे अमृतसर ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनिंदर सिंग यांनी सांगितले.या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. हल्लेखोरांबाबत  काही सुगावे हाती लागले आहेत. त्यांना लवकरच अटक केली जाईल, असेही ते म्हणाले.जुगराजचा मृतदेह उत्तरीय वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर, तो कुटुंबीयांकडे सोपविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Related Articles