‘तिबेटची सेवा करण्यासाठी आणखी ४० वर्षे जगण्याची उमेद’   

नवी दिल्ली : नागरिकांची सेवा करण्यासाठी मला आणखी ३०-४० वर्षे जगण्याची आशा आहे. अवलोकितेश्वरांचे आशीर्वाद माझ्यासोबत असल्याचे स्पष्ट संकेत मला मिळत आहेत, असे १४ वे दलाई लामा तेन्झिन ग्यात्सो यांनी सांगत उत्तराधिकार्‍याच्या घोषणेच्या अफवेला शनिवारी एक प्रकारे पूर्णविराम दिला.  
 
मॅकलिओडगंजमधील मुख्य दलाई लामा मंदिर त्सुगलागखांग येथे रविवारी त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तत्पूर्वी, एका दीर्घायुषी प्रार्थना समारंभात तेन्झिन ग्यात्सो म्हणाले, अनेक भविष्यवाण्या पाहून मला असे वाटते की, मला अवलोकितेश्वराचे आशीर्वाद आहेत. मला आशा आहे की मी आणखी ३०-४० वर्षे जगेन. भक्तांची प्रार्थना आतापर्यंत फलदायी ठरली आहे. तथापि, आपण आपला देश गमावला आहे आणि आपण भारतात निर्वासित जीवन जगत आहोत. मला शक्य तेवढी मानवांची सेवा आणि कल्याण करायचे आहे.
 
दरम्यान, तिबेटी समाजात दलाई लामांच्या उत्तराधिकारीबाबत अनेक अफवा आहेत. याबाबत स्पष्टीकरण देताना पेनपा त्सेरिंग म्हणाले की, दलाई लामा योग्य वेळ आल्यावरच उत्तराधिकार्‍याबाबत निर्णय घेतील. दलाई लामांच्या ९० व्या वाढदिवशी उत्तराधिकारी जाहीर केला जाणार असल्याच्या अफवांनाही त्यांनी फेटाळले. तिबेटी धर्मगुरुंच्या उत्तराधिकारीच्या मुद्द्यावरून चीनने वारंवार हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, निर्वासित तिबेटी सरकारचा स्पष्ट संदेश आहे की, धार्मिक परंपरा आणि तिबेटी समाजाच्या श्रद्धेवर कोणताही बाह्य हस्तक्षेप मान्य केला जाणार नाही. पेनपा त्सेरिंग यांचे वक्तव्य केवळ चीनविरोधी नाही, तर तिबेटी संस्कृती आणि धर्माच्या सन्मानासाठी उभा राहिलेला निर्धार आहे. आता संपूर्ण जगाच्या नजरा या संघर्षावर लागल्या आहेत.

Related Articles