हिमाचल प्रदेशात मुसळधार; २६० हून अधिक रस्ते बंद   

तीन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट 

सिमला : हिमाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे २६० हून अधिक रस्ते बंद आहेत. त्यापैकी १७६ रस्ते एकट्या मंडी जिल्ह्यातील आहेत. दरम्यान, स्थानिक हवामान विभागाने कांगडा, सिरमौर आणि मंडी या तीन जिल्ह्यांमध्ये रविवारसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, उना, बिलासपूर, हमीरपूर, चंबा, सोलन, सिमला आणि कुल्लू जिल्ह्यांतील काही भागात ’ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
    
२० जूनला राज्यात पाऊस सुरू झाल्यापासून आतापर्यंत ७२ नागरिकांचा  मृत्यू झाला आहे. त्यापैकी ४५ जणांचा मृत्यू ढगफुटी, अचानक पूर आणि दरड कोसळणे यासारख्या पावसाशी संबंधित घटनांमुळे झाला आहे. हवामान विभागाने नागरिकांना दरड कोसळणे, अचानक पूर, पाणी साचणे आणि कमकुवत संरचना, पिके आणि अत्यावश्यक सेवांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याबद्दल सतर्क केले आहे. तसेच, नद्या आणि नाल्यांपासून दूर राहण्याचा आणि संवेदनशील भागात जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
 
राज्य आपत्कालीन विभागानुसार, पावसामुळे जवळपास ३०० ट्रान्सफॉर्मर आणि २८१ पिण्याच्या पाण्याच्या योजनांवरही परिणाम झाला. आतापर्यंत पावसाने राज्यात ५४१ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तथापि, मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सांगितले आहे की, प्रत्यक्षात हा तोटा सुमारे ७०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. गेल्या वर्षी हिमाचल प्रदेशात पावसाने ५५० नागरिकांचा बळी घेतला होता.

Related Articles