भगवान जगन्नाथ यांची ‘बहुदा’ यात्रा मार्गस्थ   

श्री गुंडीचा मंदिराकडून जगन्नाथ मंदिराकडे रवाना 

जगन्नाथ पुरी : ओडिशातील श्री गुंडीचा मंदिरातील नऊ दिवसांचा मुक्काम आटोपल्यानंतर भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचे रथ बहुदा यात्रेच्या माध्यमातून जगन्नाथ मंदिराकडे शनिवारी मार्गस्थ झाले. 
 
तत्पूर्वी पहांडी धार्मिक अनुष्ठान आणि पूजा अर्चा प्रथेप्रमाणे करण्यात आली. त्यानंतर देवांच्या मूर्ती नंदीघोष, तालध्वज आणि दरपदलन रथात विराजमान होताच भाविकांनी मोठ्या उत्साहाने रथाचे दोरखंड ओढण्यास प्रारंभ केला. पहांडी अनुष्ठान सकाळी साडेदहा वाजता सुरू होणार होते. परंतु त्यासाठी दुपारचे १२ वाजले. त्यानंतर एका पाठोपाठ मूर्ती रथात ठेवण्यात आल्या. श्री गुंडीचा मंदिर हे तिन्ही भावडांच्या मावशीचे निवासस्थान असून ते १२ व्या शतकातील आहे. जगन्नाथ मंदिरापासून सुमारे अडीच किलोमीटवर ते आहे. या मंदिराकडे रथयात्रा सुरू झाली. या वेळी मुख्यमंत्री मोहन माझी, विरोधी पक्ष नेते नवीन पटनायक यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या. 
 
शंखध्वनी, तालवाद्यांच्या वादनाने परिसर भक्तिमय झाला होता. प्रथम सुदर्शन चक्राचा रथ मंदिराच्या आवारातून बाहेर आला. त्या पाठोपाठ बलभद्र यांचा तालध्वज, भगवान जगन्नाथ यांचा नंदीघोष आणि सुभद्रेचा दरपदलन रथ एका पाठोपाठ मार्गस्थ झाले. देव रथावर आरुढ होताच परंपरेप्रमाणे राजे गजपती देव यांनी सोन्याची काठी असलेल्या झाडूने परिसर दुपारी अडीच ते साडेतीन दरम्यान स्वच्छ केला. सायंकाळी चार वाजता भाविकांनी रथाचे दोरखंड ओढण्यास सुरूवात केली. दरम्यान रथोत्सवाचा सोहळा पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक पुरीत लोटले आहेत.
 
जगन्नाथ यात्रेला  २७ जून रोजी प्रारंभ झाला होता. त्याच दिवशी ती रात्री गुंडीचा मंदिर येथे पोहोचणार होती. मात्र, बलभद्र यांचा तालध्वज रथ एका वळणावर अडकला होता. त्यामुळे यात्रा थांबली होती. सकाळी यात्रा पुन्हा सुरू झाली आणि २८ जून रोजी ती मंदिर परिसरात पोहोचली होती. २९ रोजी पहाटे देवाचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक आले  होते. तेथे चेेंगराचेंगरी झाली. त्यात तीन भाविकांचा मृत्यू तर ५० पेक्षा अधिक जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर अनुचित घटना रोखण्यासाठी मोठा पोलिस फौजफाटा ठेवला होता. सीसीटीव्ही आणि ड्रोन सारख्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गर्दीवर लक्ष ठेवले गेले.

Related Articles