पंढरीतील श्री विठुरायाची स्वयंभू मूर्ती   

मूर्तीवर पौराणिक आणि ऐतिहासिक खुणा 

सूर्यकांत आसबे 
 
सोलापूर : तीर्थक्षेत्र पंढरपुरातील श्री विठुरायाची मूर्ती स्वयंभू आहे. श्री विठुरायाला श्री  विष्णूचा अवतार देखील मानला जातो. या मूर्तीवर काही प्राचीन, ऐतिहासिक, पौराणिक अशा खुणा आहेत. श्री विठुरायाच्या महापूजेप्रसंगी देवाचे केशरयुक्त कोमट पाण्याने स्नान झाल्यानंतर कोमल आणि मऊसूत अशा पंचाने मूर्ती कोरडी केली जाते. त्यानंतर देवाच्या कपाळी चंदनाचा एक छोटासा टिळा लावला जातो. तसेच देवाच्या मुकुटावर श्री शंभू महादेवाच्या पिंडीला लावतात, तसा अर्ध गोलाकार चंदनाचे गंध लावले जातो. त्यानंतर देवाचे पुजारी हातामध्ये चांदीचे मोठे निरंजन घेऊन देवाच्या अंगावरील या प्राचीन आणि पौराणिक खुणा भाविकांना मोठ्या आवाजात सांगतात. 
 
प्रत्येक खुणेचा उल्लेख करताना चांदीचा दीप त्या - त्या खुणेजवळ नेऊन तो अधिक चांगल्या पद्धतीने भक्तांना दिसेल असेही यावेळी पाहिले जाते. मूर्तीच्या संवर्धनार्थ आलेल्या सरकारी निर्बंधामुळे अलीकडे श्री विठुरायाच्या महापूजेचे प्रमाण कमी झाले आहे. श्री विठ्ठलाला सावळ्या, काळ्या असे संतांनी संबोधले असले तरी देवाची मूर्ती ही करड्या रंगाची असल्याची भासते. मूर्ती वालुकामय दगडाची खडबडीत अशी आहे. मूर्तीची उंची सुमारे तीन फूट नऊ इंच असावी.श्री विठुरायाच्या मस्तकावरील मुकुट हा पारशी लोकांच्या टोपी सारखा दिसतो. यालाच शिवलिंग असेही संबोधले जाते. देवाच्या मस्तकी म्हणजे एकदम वरील बाजूस शिवपिंड आहे. 
 
श्री विठुरायाच्या गळ्यात कौस्तुभ मण्यांचा कोरलेला कंठा आहे. तो छातीवर भारदस्तपणे दिसून येतो. भृगू ऋषींनी केलेल्या प्रहाराचे म्हणजेच भृगूलांच्छनाची श्री विठुरायाच्या छातीवर खूण दिसून येते. श्री विठुरायाच्या कमरेला करगोटा आहे. यालाच  तीनपदरी मेखला असेही म्हणतात. श्री विठूरायाच्या डाव्याप्रमाणे उजवाही हात कमरेवर असून तो उघडा आहे. त्या हाताचा अंगठा वळलेला असून त्यात कमलपुष्पाचा देठ आहे. देवाने वस्त्र नेसले असून त्याचा सोगा दोन्ही पायाच्या मधोमध म्हणजे घुंगूरवाळी काठीच्या वरील बाजूस या मूर्तीवर दिसून येतो.   
  
श्री विठुराया हे श्रीकृष्ण अवतारात गुराखीही होते. त्याची साक्ष पटवणारी एक खूण देवाच्या मूर्तीवर आजही दिसून येते ती म्हणजे, देवाच्या दोन्ही पायांमध्ये एक घुंगूरवाळी काठी आहे. श्री विठुरायाचा चेहरा किंचितसा उभट आकाराचा वाटतो; परंतु देवाच्या मुकुटामुळे तसा भासतो. गाल गोल व फुगीर आहेत. देवाच्या कानात मकरकुंडले असून, ती खांद्यावर विसावल्यासारखी दिसून येतात. श्री विठुरायाच्या दोन्ही दंडामध्ये बाहुभूषण कडी आहेत.
 
देवाच्या दोन्ही मनगटात दोन कडी 
  
महाभारताच्या युद्धात श्रीकृष्णाने सकाळी शंख फुंकल्यावर युद्ध सुरू होत असे. व सायंकाळी शंख फुंकल्यावर बंद होत असे. पंढरीचा विठुराय हा श्रीकृष्णाचाच अवतार आहे. त्याची खूण म्हणजे देवाच्या डाव्या हातात शंख आहे. मुक्तकेशी नावाची एक दासी होती. तिला तिच्या सौंदर्याविषयी खूप गर्व होता. ती विठुरायाच्या दर्शनाला आली तेव्हा तिने देवाच्या पायाला स्पर्श करताच तिची बोटं देवाच्या पायात रुतली. तेव्हा तिला उपरती झाली की, माझ्या सौंदर्यापेक्षाही विठुरायाचे सौंदर्य खूप कोमल आहे. त्या   मुक्तकेशीची बोटं रुतल्याची खूण पायावर आहे. श्री विठुराय दोन्ही पाय जुळवून उभे असलेली वीट ही भक्तराज पुंडलिकाने दिलेली आहे. ही वीट एक चौरस फूट आकाराची आहे.

Related Articles