पंढरीत १५ लाखांवर वैष्णव   

सोलापूर , (प्रतिनिधी) : अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर ... अशा संतोक्तीची प्रचिती देत असलेला तीर्थक्षेत्र पंढरपूरचा आषाढी सोहळा भक्तीमय वातावरणात व प्रचंड उत्साहात साजरा होत आहे. संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या असून १५ लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहे. लाखो वैष्णवांच्या मांदियाळीने पंढरपूर भक्तीमय वातावरणात न्हाऊन गेले आहे. भाविकांच्या दाटीमुळे पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. राज्यभरातून व परराज्यातून आलेल्या वैष्णवामुळे पंढरीत भाविकांचा महासागर उसळला असल्याचे चित्र दिसून येत आहे. आषाढी यात्रा ही सर्वांत मोठी यात्रा असते. या यात्रेनिमित्त शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्या मजल-दरमजल करत लाखो भाविकांसह शनिवारी रात्री पंढरीत दाखल झाल्या. 
 
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखीचे वाखरी येथील शेवटचे उभे रिंगण शुक्रवारी दुपारी संपल्यानंतर पालख्या वाखरी मुक्कामी आल्या होत्या. शनिवारी दुपारी पंढरपूरच्या वेशीवर विसावा मंदिर इसबावी येथे पालख्या दाखल झाल्या. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. माउली आणि तुकोबांची पालखी पंढरपुरात दाखल होताच फूलांची उधळण करत सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. आषाढी यात्रेकरिता आलेल्या भाविकांनी चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर परिसर, दर्शन रांग व उपनगरीय भाग गजबजला आहे. दर्शन रांगेत तीन लाखांहून अधिक भाविक आहेत. भाविकांना दर्शनासाठी जवळपास आठ ते दहा तासांचा कालावधी लागत आहे. चंद्रभागेत मुबलक पाणी सोडण्यात आल्यामुळे भाविकांना स्नान करता येत आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जीवरक्षक दलाच्या स्पीड बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. आठ हजारांहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण पंढरपूर शहरावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याची करडी नजर आहे. नगरपालिका, जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन यांच्यावतीने वारीत येणार्‍या भाविकांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.

Related Articles