उपमुख्यमंत्री पवारांच्या आदेशाला महामार्ग प्रशासनाकडून ’केराची टोपली’   

भिगवण, (वार्ताहर) : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशांना राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय आहे. गेल्या एक महिन्यापासून शहरातील गटारी उघड्याच असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, व्यावसायिकांचेही कंबरडे मोडले आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
 
गेल्या महिन्यात भिगवण परिसरात झालेल्या अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता. बसस्थानक, सरकारी रुग्णालय आणि थोरातनगर परिसर पाण्याखाली गेल्याने शेकडो कुटुंबांचे संसार उद्वस्त झाले, अनेकांची घरे पाण्याखाली गेली आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले. या विनाशाचे मूळ कारण म्हणजे गटारींची योग्य साफसफाई आणि व्यवस्थापन न केल्यामुळे त्या तुंबल्या होत्या, ज्यामुळे पावसाच्या पाण्याला निचरा होण्यासाठी मार्गच मिळाला नाही.
 
या गंभीर परिस्थितीची दखल घेत पूरग्रस्त पाहणी दौर्‍यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी परिस्थितीची पाहणी करत महामार्ग प्रशासनाला गटारी साफ करून मार्ग मोकळे करण्याचे आणि प्रसंगी पर्यायी गटारी तयार करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी करत केवळ तीन दिवस ’दिखाऊ’ काम केले. गटारींची झाकणे काढली आणि ज्यांची झाकणे निघत नव्हती, ती पूर्णपणे फोडली. मात्र, त्यानंतर प्रशासनाला याचा पूर्णपणे विसर पडला आहे. गेल्या एक महिन्याहून अधिक काळ लोटला तरी, या गटारी आजही पूर्णपणे उघड्या आहेत. यामुळे गटारांमधील दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे अनेक आजारांची भीती निर्माण झाली आहे. उघड्या गटारींमुळे लहान मुलांना आणि वयोवृद्ध नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, अपघाताच्या गंभीर घटनाही घडत आहेत. अनेक व्यवसाय विस्कळीत होण्याच्या मार्गावर आले आहेत.
 
उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महामार्ग प्रशासनाने चक्क ’केराची टोपली’ दाखवल्याचे हे धक्कादायक वास्तव आहे. गटार व्यवस्थापनातील या अक्षम्य दिरंगाईमुळे भिगवणमधील नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन गटारींची झाकणे बसवावीत आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावर तात्काळ उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
 
महामार्ग प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आमच्या व्यवसायावर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून लवकरात कामे झाली नाही तर आम्ही आंदोलन करणार आहोत.
- बॉबी एम थॉमस, व्यावसायिक 
 
 महामार्ग प्रशासनाबरोबर बोलणे चालू असून लवकरात लवकर राहिलेली गटारीची कामे करून घेण्यात येतील.
- गुरप्पा पवार, सरपंच, भिगवण. 

Related Articles