दिव्यांग शिक्षकांच्या फेर तपासणीस ‘ससून‘चा स्पष्ट नकार   

पुणे : पुणे जिल्हा परिषदेतील सर्वच दिव्यांग शिक्षकांच्या दिव्यंगात्वाची फेर पडताळणी करण्यास ससून रुग्णालयाने स्पष्ट नकार दिला आहे. रुग्णालयातील दैनंदिन कामाचा वाढता व्याप लक्षात घेऊन ही फेर पडताळणी करणे अशक्य असल्याचे कारण ससून रुग्णालयाने दिले आहे. याबाबत एक पत्राद्वारे ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव यांनी ही माहिती जिल्हा परिषदेला दिली आहे. दरम्यान, डॉ. जाधव यांनी या दिव्यांग शिक्षकांची दिव्यांगत्वाची फेर पडताळणी ही मुंबईतील जे जे रुग्णालयात करण्याचा सल्ला जिल्हा परिषदेला दिला आहे. या पार्श्वभूमीवर आंतर जिल्हा बदलीतून सूट मिळण्यासाठी अर्ज केलेल्या दिव्यांग शिक्षकांच्या बदल्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
जिल्हा परिषदेतील काही शिक्षकांनी जिल्हांतर्गत बदलीतून सूट मिळविण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले आहे. मात्र, यामधील अनेक दिव्यांग प्रमाणपत्रे ही बोगस असल्याच्या तक्रारी विविध दिव्यांग संघटनांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे. मात्र, जिल्हा परिषदेकडून ही बोगस प्रमाणपत्र असल्याची फेरपडताळणी करण्यास अजिबात रस घेतला नाही. मात्र, दिव्यांग संघटनांकडून मोठ्या प्रमाणात ओरड सुरू झाल्यानंतर या तक्रारींची गंभीर दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी घेतली आणि शिक्षकांच्या दिव्यांगत्वाची फेरपडताळणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी ससून रुग्णालयस पत्र पाठवून सोबत जिल्हा परिषदेच्या ४०९ दिव्यांग शिक्षकांची यादी पाठविली.
 
या पत्राच्या अनुषंगाने ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जाधव यांनी हे पत्र जिल्हा परिषदेला पाठवले आहे. त्यामध्ये ससून रुग्णालय हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे टर्शरी केअर सेंटर असल्यामुळे येथे गंभीर-अतिगंभीर रुग्णांची संख्या ही प्रचंड मोठी आहेे. न्यायालयात आणि पोलीस विभागाकडून अनेक आरोपी हे वैद्यकीय तपासणीसाठी आणि उपचारांसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात येतात. या रुग्णांची संख्या मोठी आहे.
 
शिवाय संस्थेत शिक्षण घेतलेले पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे अध्यापन, प्रात्यक्षिके व परीक्षा ही कामेसुद्धा रुग्णालयातील डॉक्टरांना असतात. तातडीची रुग्णसेवा, न्याय वैद्यकीय आणि वैद्यकीय प्रकरणे तसेच व्हीव्हीआयपी व्हिजीट, एमएलसी पुरविण्यात येते. त्यामुळे ससून रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आठवड्यातून केवळ दोनच दिवस देण्यात आलेले आहेत. या सर्व बाबींमुळे या रुगण्यायलयातील कार्यरत डॉक्टरांवर कामांचा अतिरिक्त ताण जादा आहे. अशा परिस्थितीत ससूनमधील दिव्यंगात्वाची फेरपडताळणी करणे अशक्य असल्याचे डॉ. जाधव यांनी या पत्रात म्हटले आहे.

Related Articles