खंबाटकी घाटात मालमोटारीला आग   

वीस लाखांचे नुकसान

सातारा, (प्रतिनिधी) : पुणे-बंगळूर  महामार्गावर खंबाटकी घाटात सायंकाळी माल मालमोटारीला  अचानक लागलेल्या आगीत मालमोटार साहित्यासह जळाली. या आगीत सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
   
शकिल आलम हा चालक  मालमोटार घेऊन मुंबईहून बंगळूरकडे जात होता. मालमोटारीमध्ये प्रदर्शनात वापरले जाणारे साहित्य होते. खंबाटकी घाटातून जात असताना, अचानक केबिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. आग लागल्याचे लक्षात  येताच चालक शकिल आलम आणि साहित्याचा मालक अमन कुमार यांनी तातडीने मालमोटारीमधून बाहेर उड्या मारल्या. त्यांनी अग्निरोधक यंत्राच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु वार्‍यामुळे आगीने मोठा भडका घेतला आणि वाहन व त्यातील साहित्य पूर्णपणे जळाले.
 
घटनेची माहिती मिळताच खंडाळ्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मस्के आणि महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब वंजारे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. एशियन पेंट आणि वाई पालिकेच्या आग बंबानी आग आटोक्यात आणली. आगीमुळे खंडाळ्याच्या बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाल्याची माहिती उपनिरीक्षक संतोष मस्के यांनी दिली.

Related Articles