विठ्ठलमूर्ती सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा संदेश देते   

डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे प्रतिपादन 

पुणे : मूर्तिशास्त्राने सर्वसामान्यांचे चर्मचक्षू आणि भावचक्षू यांचा सूक्ष्म विचार केला आहे. श्री विठ्ठलाची मूर्ती याच विचारांची परिणती आहे. विठ्ठलमूर्ती ही सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा संदेश देणारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ मूर्तिशास्त्र तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी शनिवारी केले.
 
इंडी हेरीटेजतर्फे सुरु करण्यात आलेल्या मास्टर क्लास उपक्रमाचा शुभारंभ डॉ. देगलूरकर यांचे ‘विठ्ठल मूर्ती’ या विषयावरील व्याख्यानाने झाला. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या फिरोदिया सभागृहात झालेल्या या मास्टर क्लासला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.डॉ. देगलूरकर म्हणाले, तत्कालीन सामाजिक परिस्थितीची गरज म्हणून सर्व समाजघटक एकत्र यावेत, त्यांनी एकाच देवतेची उपासना करावी, या संतविचारांची पार्श्वभूमी यामागे आहे. मूर्तिशास्त्राचा उल्लेख पाणिनी, कौटिल्य या सारख्या धुरिणांनी केला आहे. सुरुवातीला पाषाणखंड रूपात आढळणार्‍या मूर्ती कालांतराने मनुष्यरूपात घडविल्या जाऊ लागल्या. देवतेचे श्रेष्ठत्व दर्शवण्यासाठी मूर्तीला अधिक हात, मस्तके, अलंकार अशी सजावट सुरू झाली, असेही डॉ. देगलूरकर यांनी नमूद केले.
 
इसवी सनाच्या १२ व्या शतकापर्यंत मूर्तिकला परिणत अवस्थेत पोहोचली होती. उपासकांच्या कल्पनेनुसार मूर्तींची घडण केली जाऊ लागली. मूर्तीच्या माध्यमातून तत्त्वविचार, अध्यात्म हेही सांगितले जाऊ लागले. उपासकांमध्ये मतभेद होऊ लागल्यावर आणि परकीय आक्रमणांचे संकट ओढवल्यावर समाजघटकांचे विखुरलेपण संपवून, समाज एकत्र यावा, सामाजिक अभिसरण घडावे, अशा उदात्त हेतूने संतपरंपरेने विठ्ठल या देवतेच्या माध्यमातून महत्त्वाचे सामाजिक योगदान दिले. विठ्ठल म्हणजेच विष्णू असून विठ्ठलमूर्ती ही योगस्थानक मूर्ती आहे. विठ्ठलमूर्तीला दोनच हात आहेत. कारण योगमूर्ती असल्याने चक्र, गदेसारखी शस्त्रे अप्रस्तुत ठरतात. माढा येथील मूर्ती ही मूळ मूर्ती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. इंडी हेरीटेजचे तुषार जोशी यांनी प्रास्ताविक केले. अनुश्री घिसाड यांनी डॉ. देगलूरकर यांचा परिचय करून दिला.

Related Articles