विठ्ठलभक्तीतून जनसेवेचे दर्शन   

वाणी कुटुंबीयांचे २७ वर्षांपासून सेवा कार्य

पुणे : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणार्‍या वारकर्‍यांसाठी गेल्या २७ वर्षांपासून वाणी कुटुंबीय निःस्वार्थ भावनेतून अन्नदान सेवा करत आहेत. कै. धनशेठ अंबरनाथ वाणी यांनी सुरू केलेली ही सेवा परंपरा आता त्यांचे पुत्र राम आणि लखन वाणी सन्मानाने पुढे नेत आहेत.
 
मसनेरवाडी (ता. दौंड) येथील वाणी कुटुंबीयांनी पाटसजवळील रोटी घाट येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील हजारो वारकर्‍यांना भोजन पुरवले. थकलेल्या वारकर्‍यांसाठी ही भोजन सेवा म्हणजेच विठ्ठलसेवा मानली जाते, असे ज्येष्ठ सदस्य अंबरनाथ वाणी यांनी सांगितले.कै. धनशेठ वाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी ही सेवा अखंड सुरू असून, गावातील नागरिकांसाठी पालखीचे दर्शन घेता यावे यासाठी मोफत ट्रॅक्टर-ट्रॉलीचीही व्यवस्था केली जाते.
 
याप्रसंगी विठ्ठलभक्त राम वाणी म्हणाले, वारी ही केवळ चालणं नसून भक्तीची यात्रा आहे. ही समतेची आणि लोकशाहीची जिवंत प्रतिमा आहे.या सेवाकार्यात वाणी कुटुंबातील अंबरनाथ वाणी, जया वाणी, राजेंद्र वाणी, काशिनाथ वाणी, राम, लखन, ऋतुजा, गौरी वाणी यांचा मोलाचा सहभाग असून, हजारो वारकरी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Related Articles