बिहारमध्ये उद्योगपतीची हत्या   

पाटणा : बिहारचे प्रख्यात उद्योगपती गोपाल खेमका यांची दुचाकीवरुन आलेल्या दोन मारेकर्‍यांनी गोळ्या घालून हत्या केली. यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक तातडीने बोलावली.
 
पाटणा येथील गांधी मैदानाजवळ शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास खेमका यांची हत्या करण्यात आली. परिसरात गस्त घालणार्‍या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसर ताब्यात घेतला. न्यायवैद्यक तज्ज्ञांना पुरावे गोळा करण्यासाठी बोलावले आहे. तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक दीक्षा यांनी दिली. घटनास्थळावरुन गोळ्या आणि काडतुसे सापडली. सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींची ओेळख पटविण्याचे काम सुरू आहे. दुचाकीवरुन आलेल्यांनी खेमका यांची हत्या केली असल्याचे उघड होत आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, सहा वर्षांपूर्वी हाजीपूर येथे खेमका यांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या केली. 
  
दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबतच्या बैठकीला बिहारचे पोलिस महासंंचालक विनय कुमार आणि ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते बैठकीत खेमका यांच्या हत्येच्या विषयावर चर्चा करण्यात आली. दोषीवर आणि निष्क्रिय पोलिस कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पोलिस खात्याने सांगितले की, पावणेबारा वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. त्यानंतर ३० ते ३५ मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि खेमका यांना कनकबाग रुग्णालयात उपचारार्थ हलवले. पोलिस अधिकारी १२ वाजून ४० मिनिटांनी घटनास्थळी पोहोचले होते.

Related Articles