दौंड, (प्रतिनिधी) : राज्यासह विधानसभा अधिवेशनात गाजलेल्या दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील दरोडा आणि अत्याचार प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलीस प्रशासनाला यश आले आहे. ३० जून रोजी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या दरम्यान पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील स्वामी चिंचोली गावाच्या हद्दीमध्ये मोटारीमधून पंढरपूरला जाणार्या महिला भाविकांना दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी कोयत्याचा धाक दाखवून भाविकांचा दिड लाखांचा ऐवज लुटला होता. मात्र, हे नराधम तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी भाविकांसोबत असणार्या अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे अत्याचार केला होता. पंढरपूरला जाणार्या भाविकांना लुटण्यात आल्याची घटना संपूर्ण राज्यात गाजत असतानाच दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभा अधिवेशनात सुद्धा घटनेचा तीव्र निषेध करीत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पोलीस प्रशासनाने घटनेचे गांभीर्य घेत तपासासाठी पथके तैनात केलेली होती. ४ जुलै रोजी पुणे जिल्हा ग्रामीण गुन्हे शोध पथकाने विशेष तपास मोहीम राबवत या घटनेतील संशयीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. एक आरोपी हा माळशिरस जि. सोलापूर येथील तर दुसरा आरोपी हा भिगवण, जि. पुणे येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. लवकरच या आरोपींची संपूर्ण माहिती आणि घटनाक्रम पोलिसांकडून आज पत्रकार परिषदेमध्ये देण्यात येणार आहे.
Fans
Followers