सिराजने टिपले ६ बळी   

बर्मिंगहॅम : महमद सिराज आणि आकाश दीप यांच्या भेदक मार्‍याच्या जोरावर भारतीय संघाने दुसर्‍या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाला ४०७ धावांवर रोखले आहे. यासह भारतीय संघाने या सामन्यात १८० धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. सिराज-आकाश दीप जोडीनं अवघ्या ८४ धावांवर इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत धाडला होता. त्यानंतर जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक यांनी त्रिशतकी भागीदारी रचत इंग्लंडचा डाव सावरला. आकाश दीपनं सेट झालेली ही जोडी फोडली. मग मोहम्मद सिराजनं तळाच्या फलंदाजीला सुरुंग लावला.
 
तिसर्‍या दिवसाच्या खेळातील पहिल्याच सत्रात टीम इंडियानं इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत धाडला होता. पण त्यानंतर जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक दोघांनी दीड शतकी खेळीसह सहाव्या विकेटसाठी ३०३ धावांची दमदार भागीदारी रचली. ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरली. नवा चेंडू येताच आकाश दीपनं हॅरी ब्रूकच्या रुपात टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. त्याने २२३४ चेंडूत १७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १५८ धावांचे योगदान दिले. ३८७ धावांवर इंग्लंडच्या संघाला सहावा धक्का बसला. या विकेटसह आकाश दीपनं आपल्या खात्यात चौथी विकेट जमा केली. 
 
इंग्लंडची सेट झालेली जोडी फुटल्यावर सिराजनं इंग्लंडच्या तळातील फलंदाजांना फार काळ मैदानात टिकू दिले नाही. उर्वरित सर्व चार विकेट्स घेत सिराजनं इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच पाच विकेट्स घेण्याचा डाव साधला. यजमान संघाने अवघ्या २० धावात अखेरच्या ४ विकेट्स गमावल्या. इंग्लंडच्या संघाकडून जेमी स्मिथ एका बाजूला शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने २०७ चेंडूत  २१ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने १८४ धावांची खेळी केली.

Related Articles