इंग्लंडचा ५ धावांनी विजय   

लंडन : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ सध्या इंग्लंड दौर्‍यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. पहिल्या दोन सामन्यानंतर भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना लंडन येथील ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात आला. हा सामना जिंकून भारतीय संघाला इंग्लंडमध्ये पहिली मालिका जिंकण्याची संधी होती. इंग्लंडने दमदार पुनरागमन करत या सामन्यात भारतीय महिला संघाला पराभूत करत मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघ २-१ असा आघाडीवर असून मालिकेवर कब्जा करण्यासाठी उर्वरित २ पैकी एक सामना जिंकण्याचे चॅलेंज हरमनप्रीत ब्रिगेडसमोर असेल.
 
लंडन येथील ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात टीम इंडियाने यजमान इंग्लंड संघाविरुद्ध पहिल्यांदा गोलंदाजी करताना २५ चेंडूत ९ बळी घेत इंग्लंडच्या बॅटिंग ऑर्डरला सुरुंग लावला. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा जोडीने स्फोटक अंदाजात संघाला दमदार सुरुवात करून दिली. पण एवढं सगळे होऊनही शेवटी इंग्लंडच्या संघाने पुनरागमन करत भारतीय संघाला ५ धावांनी पराभूत केले.   
 
पहिल्या दोन टी-२० सामन्यानंतर २-० अशा फरकाने पिछाडीवर असलेल्या इंग्लंड महिला संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना सलामीची बॅटर सोफिया डंकली आणि डॅनियेल निकोल वेट यांनी शतकी भागीदारी केली. १५ व्या षटकातील दुसर्‍या चेंडूवर सोफिया ५३ चेंडूत ७५ धावांची खेळी करून माघारी फिरली.  पुढच्या षटकात डॅनियेल वेट हिने ४२ चेंडूत ६६ धावांवर तंबूचा रस्ता धरला. 
 
या दोघी आउट झाल्यावर इंगंल्डच्या ताफ्यातील एकीलाही मैदानात तग धरता आला नाही. १९.२ षटकापर्यंत इंग्लंडच्या संघाने ९ फलंदाज गमावले. परिणामी सलामी जोडीनं दमदार सुरुवात करून देऊनही इंग्लंडच्या संघाला निर्धारित २० षटकात १७१ धावांपर्यंतच मजल मारता आली. धावांचा पाठलाग करताना स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या दोघींनी पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी रचली. शेफाली वर्मानं २५ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ४७ धावांची खेळी केली. 
 
दुसर्‍या बाजूला स्मृती मानधना हिने ४९ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. भारतीय महिला संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण जेमिमा रॉड्रिग्ज २०(१५) आणि हरमनप्रीत कौर २३ (१७) यांच्याशिवाय अन्य कोणत्याही बॅटरला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारतीय महिला संघाने निर्धारित २० षटकात १६६ धावांपर्यंत मजल मारली.

Related Articles