न्यूझीलंडचा खरा नायक   

मडविकेट,कौस्तुभ चाटे 

सर रिचर्ड जॉन हॅडली हे नाव उच्चारलं की क्रिकेट विश्वातील एका अत्यंत सुसंस्कृत पण धगधगत्या ज्वालेची आठवण येते. न्यूझीलंडसारख्या लहानशा देशाने जागतिक क्रिकेटमध्ये जेव्हा भरारी घेतली, तेव्हा त्या प्रवासाच्या केंद्रस्थानी होते सर रिचर्ड हॅडली. त्यांची कारकीर्द म्हणजे चिकाटी, शिस्त आणि प्रतिभेचं उत्तुंग उदाहरण आहे असे निश्चित म्हणता येईल.
 
रिचर्ड हॅडलीचा जन्म ३ जुलै १९५१ रोजी ख्राईस्टचर्चमधील. हॅडली कुटुंब तसे क्रिकेटप्रिय. रिचर्डचे वडील वॉल्टर हॅडली हे स्वतः न्यूझीलंड संघाचे माजी कर्णधार. वडिलांनी १९४९ मध्ये न्यूझीलंड संघाचं इंग्लंड दौर्‍यावर नेतृत्व केलं होतं आणि देशातल्या क्रिकेट प्रशासनातही त्यांचं स्थान अत्यंत मानाचं होतं. त्यामुळे रिचर्डचा क्रिकेटचा पाया घरात अगदी लहानपणापासूनच पक्का झाला होता. पाच भावांपैकी सर्वात धाकटा असलेला रिचर्ड लवकरच घरच्या परंपरेपेक्षा पुढे जाणार, याची चाहूल त्याच्या बालपणातच लागली होती. रिचर्डचे दोन भाऊ डेल आणि बॅरी देखील न्यूझीलंडसाठी खेळले. त्या पैकी एकाची  पत्नी कॅरेन ही देखील न्यूझीलंडसाठी कसोटी क्रिकेट खेळली आहे. 
 
लहानग्या रिचर्डचा रस अ‍ॅथलेटिक्समध्ये होता. पण घरातील क्रिकेटचे वातावरण त्याला खेळापासून दूर नेऊ शकले नाही. कँटरबरी संघासाठी सुरुवात करताना गोलंदाज म्हणून त्याने चांगली कामगिरी केली. त्यांचा नैसर्गिक वेग, चेंडू हलवण्याची क्षमता आणि खेळाविषयीची संवेदनशीलता यांचं मिश्रण होतं.१९७१-७२ मध्ये कँटरबरीकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि लगेचच तो वेग, ती प्रतिभा सर्वांच्या नजरेत भरली.१९७३ मध्ये रिचर्डला पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. सुरुवातीच्या काही वर्षांत त्याच्या कामगिरीत सातत्य नव्हते, पण त्याच्या प्रयत्नात मात्र कुठेही कमतरता नव्हती. रिचर्ड हॅडली जेवढा प्रतिभावान होता, त्याहून अधिक मेहनती होता असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्याने स्वतःचं शरीर, मानसिकता आणि तंत्र शिस्तबद्ध पद्धतीने घडवलं आणि याचाच परिणाम म्हणजे १९७० च्या दशकाच्या अखेरीस जगातील सर्वोत्तम जलदगती गोलंदाजांपैकी रिचर्ड हॅडली हे नाव आदराने घेतलं जाऊ लागलं. 
 
१९७६-७७ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर त्याने ब्रिस्बेनमध्ये ६/२६ अशी कमाल कामगिरी करत न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिलाच कसोटी विजय मिळवून दिला. हा विजय केवळ खेळातील नव्हता, तर न्यूझीलंडच्या आत्मविश्वासाचा आणि प्रतिष्ठेचाही होता. पुढील दशकभर हॅडलीने अशी कामगिरी अनेकदा केली. ८६ कसोटींमध्ये ४३१ बळी हे त्याच्या गोलंदाजी बद्दल बरंच काही बोलून जातात. त्याची गोलंदाजी सरासरी २२.२९ इतकी कमी होती आणि स्ट्राईक रेट आजही गोलंदाजांसाठी आदर्श मानला जातो. त्याचप्रमाणे, एक दिवसाच्या  क्रिकेटमध्ये हॅडलीने  १५८ बळी घेतले आणि तेवढ्याच ताकदीनं फलंदाज म्हणूनही आपली छाप पाडली. हॅडली ने कसोटीत ३१२४ धावा केल्या आहेत , ज्यामध्ये २ शतके आणि १५ अर्धशतकांचा देखील समावेश आहे. १९८५ मध्ये ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी एका कसोटीत ९/५२ अशी कामगिरी केली आणि संपूर्ण सामन्यात तब्बल १५ बळी घेतले. ही कामगिरी क्रिकेट इतिहासातील काही सर्वोत्तम स्पेल्स पैकी एक मानली जाते. विशेष म्हणजे न्यूझीलंडने हा सामना डावाने जिंकला - ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध हे अत्यंत दुर्मिळ होतं.
 
रिचर्ड हॅडली हे एक अष्टपैलू खेळाडू होते, पण त्यांचा खरा प्रभाव त्यांच्या गोलंदाजीत होता. त्यांचे समकालीन खेळाडू - इम्रान खान, कपिल देव, इयान बोथम - यांच्याशी त्यांची कायम तुलना होत असे, पण हॅडली अनेकदा केवळ आपल्या एकहाती गोलंदाजीवर सामने जिंकत असत.त्यांचा दृष्टिकोन कायमच संपूर्णत: व्यावसायिक होता. त्यांनी आपल्या कारकीर्दीत प्रथमच फिजिकल ट्रेनिंग, मानसिक तयारी, तांत्रिक आत्मपरीक्षण या गोष्टींना महत्त्व दिलं. त्यांच्या आधी फारच थोडे खेळाडू स्वतःच्या खेळात एवढा अभ्यास आणि काटेकोर शिस्त आणत असत. त्यामुळेच त्यांच्या कारकीर्दीत न्यूझीलंडने जागतिक क्रिकेटमध्ये नवा आत्मविश्वास मिळवला. १९८६ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांनी न्यूझीलंडला पहिलाच ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवून दिला. निवृत्तीनंतरही त्यांनी क्रिकेटपासून स्वतःला वेगळं केलं नाही. त्यांनी न्यूझीलंड संघाचे निवड समिती प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि डॅनियल व्हेटोरी, शेन बॉण्ड यांसारख्या खेळाडूंना घडवण्याचे काम केले. त्यांच्या अनुभवाचा फायदा पुढच्या पिढीला झाला.
 
१९९० मध्ये त्यांना ‘नाइटहूड’ किंवा ’सर’ ही उपाधी मिळाली - ही उपाधी मिळवणारे ते पहिले सक्रिय क्रिकेटपटू होते. केवळ क्रिकेटमधील यशासाठीच नाही, तर त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वासाठी हे सन्मान देण्यात आला. त्यांनी सामाजिक कार्यातही सहभाग घेतला. २०१८ मध्ये त्यांना आतड्याच्या कर्करोगाचं निदान झालं आणि त्यानंतर त्यांनी जनजागृतीसाठी काम सुरू केलं. त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या डळी ठळलहरीव करवश्रशश डिेीीीं र्ढीीीीं या संस्थेद्वारे ते युवा खेळाडूंना आर्थिक मदत करतात.आज रिचर्ड हॅडली हे केवळ न्यूझीलंडचे नाही, तर संपूर्ण क्रिकेटविश्वाचे दैवत मानले जातात. त्यांच्याच नावाने न्यूझीलंडमध्ये मैदान आहे, विक्रम आहेत, आणि त्यांचं स्थान अजूनही अढळ आहे. छोट्या देशासाठी ते एक भव्य आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व ठरले. न्यूझीलंड क्रिकेटला त्यांनी दिलेली दिशा, शिस्त, आत्मभान आणि विजयांची सवय - हे सगळं अजूनही त्यांच्या नावाच्या गर्जनेत ऐकू येतं.काही दिवसांपूर्वीच रिचर्ड हॅडली यांनी वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश केला आहे. न्यूझीलंडसाठी आयुष्य वेचणार्‍या या दर्जेदार अष्टपैलू खेळाडूला पुढील आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा. 

Related Articles