E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
ताज्या दमाचा डावा ‘डेमोक्रॅट’!
Wrutuja pandharpure
06 Jul 2025
चर्चेतील चेहरे, राहुल गोखले
न्यू यॉर्क शहराच्या महापौरपदाची निवडणूक येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार असली तरी तिचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डेमोक्रॅट पक्षाच्या अंतर्गत उमेदवार निवडीत ३३ वर्षांच्या झोरान ममदानी यांनी मारलेली बाजी. त्यांची लढत प्रामुख्याने होती ती डेमोक्रॅट पक्षाचे ६७ वर्षीय बुजुर्ग नेते अँड्र्यू क्यूमो यांच्याशी. क्यूमो हे न्यू यॉर्क प्रांताचे माजी गव्हर्नर. त्यांचा राजकारणातील अनुभव दांडगा. त्यांच्या तुलनेत ममदानी अगदीच नवखे. तरीही या सर्वार्थाने विषम लढतीत ममदानी यांनी बाजी मारली आणि आता ते न्यू यॉर्क शहराचे पुढचे महापौर होणार असे गृहीत धरले जात आहे. त्याचा एक पुरावा म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी हे ‘वेडे कम्युनिस्ट’ (कम्युनिस्ट ल्यूनाटिक) आहेत अशी केलेली बोचरी टीका. ट्रम्प यांच्यासाठी आपण दुःस्वप्न असल्याची प्रतिक्रिया ममदानी यांनी दिली आहे. लॉस एंजेलिस प्रांताचे डेमोक्रॅट गव्हर्नर गॅविन न्यूसम आणि ट्रम्प यांच्यातील वाद ताजा असतानाच ममदानी यांची न्यू यॉर्क शहराच्या महापौरपदाचे डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार म्हणून निवड व्हावी हा विलक्षण योगायोग.
ममदानी हे अमेरिकेला आले तेंव्हा ते सात वर्षांचे होते. १८ ऑक्टोबर १९९१ रोजी युगांडामधील कम्पाला येथे जन्मलेले ममदानी यांच्या नावातील क्वामे हे मधले नाव त्यांना त्यांच्या वडिलांनी घाना देशाच्या पहिल्या पंतप्रधानांच्या नावावरून दिले आहे. काही काळ हे कुटुंबीय केप टाऊन येथे वास्तव्यास होते. ममदानी यांची आई मीरा नायर या ‘मॉन्सून वेडिंग’, ‘मिसिसिप्पी मसाला’ अशा गाजलेल्या चित्रपटांच्या दिग्दर्शक; तर वडील महमूद हे आता कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. ते दोघेही हार्वर्ड विद्यापीठाचे स्नातक. महमूद शिष्यवृत्तीवर अमेरिकेत आले आणि मग ते कुटुंब तेथेच स्थयिक झाले. ब्रॉन्क्स प्रशालेत झोरान ममदानी यांचे शिक्षण झाले. त्यानंतर बोवडोईं महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. २०१८ मध्ये ममदानी यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.
राजकारणाकडे ते कालांतराने वळले; पण ते तत्पूर्वी जे करीत होते तेथे आलेले अनुभवच त्यांना राजकारणात सक्रिय होण्यास प्रवृत्त करणारे ठरले. न्यू यॉर्क शहरात अल्प उत्पन्न गटातील नागिरकांना घराच्या कर्जाचे हफ्ते फेडता येत नाहीत म्हणून बेघर होण्याची वेळ येते. पदवीधर झाल्यानंतर ममदानी अशांचे सल्लागार-समुपदेशक म्हणून काम करू लागले. त्यावेळी त्यांना आलेल्या अनुभवांनी या समस्यकडे गांभीर्याने पाहण्यास त्यांना भाग पाडले. तत्पूर्वी शाळेत शिकत असताना ममदानी यांनी शाळेचा पहिलावाहिला क्रिकेट संघ स्थापन केला होता. त्या संघाने नंतर लीग सामन्यांत भागही घेतला होता. त्या स्पर्धेत त्या संघाला फारसे यश मिळाले नाही; पण त्या प्रयोगाने ममदानी यांना शहाणीव दिली. समविचारी माणसे एकत्र आली तर ते परिणामकारक बदल घडवून आणू शकतात हा बोध त्यांनी त्यातून घेतला. राजकारणात सक्रिय झाल्यावर तेच सूत्र त्यांनी वापरले.
त्यांच्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली ती न्यू यॉर्क प्रांताच्या विधिमंडळाच्या निवडणुकीने. त्यावेळीही विधिमंडळ सदस्य म्हणून चार कार्यकाळ कार्यरत असणार्या प्रतिस्पर्ध्याला धूळ चारत ममदानी यांनी प्राथमिक फेरी जिंकली आणि मग प्रत्यक्ष निवडणुकीत देखील ते विजयी झाले. न्यू यॉर्क विधिमंडळात पोचणारे ते दक्षिण आशियायी वंशाचे पहिले सदस्य ठरले. त्या सभागृहात त्यापूर्वी दोनदा मुस्लिम उमेदवार निवडून गेले होते. ममदानी तिसरे मुस्लिम सदस्य. त्याच मतदारसंघातून ममदानी २०२२ आणि २०२४ मध्येही निवडून आले. या आपल्या कार्यकाळात त्यांनी इस्रायलधार्जिण्या ज्यूंना असणारा आपला विरोध प्रकट केला तद्वत पॅलेस्टिनींना असणार्या सहानुभुतीचीही चुणूक दाखविली. अर्थात त्यात नवे काही नव्हते. ते विद्यार्थी असतानाच त्यांनी ’स्टुडंट्स फॉर जस्टिस इन पॅलेस्टाईन’ या संघटनेच्या शाखेची स्थापना केली होती. ’बॉयकॉट, डायव्हेस्टमेन्ट अँड संक्शन्स’ या इस्रायलवर सनदशीर मार्गाने दबाव आणण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या संघटनेचे देखील ममदानी समर्थक राहिले आहेत. या भूमिकांमुळेच त्यांच्यावर काही समाजघटकांकडून सडकून टीका होत आहे.
आताही प्रचारात त्यांनी आपला इस्रायलविरोध लपवला नाही; उलट मुस्लिम चेहरा म्हणून आपली ओळख निर्माण व्हावी यासाठी आवर्जून प्रयत्न केला. त्यांनी अनेक मशिदींना भेटी दिल्या. आपल्या प्रचाराचे व्हिडियो उर्दू भाषेत प्रसृत केले. विधिमंडळ सदस्य असतानाही त्यांनी इस्रायली वसाहतींना आर्थिक मदत करणार्या स्वयंसेवी संस्थांची कारमाफीची तरतूद रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला होता. तो अर्थातच मंजूर झाला नाही कारण खुद्द डेमोक्रॅट पक्षातूनच त्याला विरोध झाला होता. ममदानी यांचा प्रयत्न तेंव्हापासून डेमोक्रॅट पक्षातील डावा चेहरा बनण्याचा आहे. इस्रायल आणि त्या देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना असणारा विरोध ममदानी यांनी वारंवार व्यक्त केला आहे. इस्रायल गाझापट्टीत नरसंहार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला; नेतान्याहू यांना आंतरराष्ट्रीय समुदायाने अटक करायला हवी असे मत त्यांनी व्यक्त केले.
अर्थात महापौरपदाच्या निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर त्यांनी इस्रायलला आपले अस्तित्व टिकविण्याचा अधिकार असल्याची भूमिका मांडली; पण त्यावेळीच इस्रायलने सर्वधर्मसमभावाच्या तत्वावर कारभार करावा असेही आवाहन केले. २०२३ मध्ये इस्रायलने गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ ममदानी यांनी पाच दिवसांच्या आंदोलनात भाग घेतला होता. न्यू यॉर्कमधील मुस्लिमांची संख्या सुमारे साडे सात लाख आहे. लोकसंख्येच्या हे प्रमाण नऊ टक्के आहे. तेंव्हा ममदानी यांचा हेतू या समुदायाला चुचकारण्याचा होता यात शंका नाही. त्याबरोबरच त्यांनी साद घातली ती आशियाई समुदायाला आणि शहरातील सर्वसामान्य जनतेला. त्यासाठी त्यांनी हिंदी चित्रपटांतील दृश्यांचा प्रचारात वापर केला; तर दुसरीकडे त्यांनी आपला प्रचारनिधी श्रीमंतांच्या स्पर्शापासून दूर ठेवला.
विधिमंडळ सदस्य असतानाही ते शहरातील टॅक्सी चालकांच्या पंधरा दिवसांच्या उपोषणात सहभागी झाले होते. कधी मॅनहॅटनचा सुमारे तेरा मैलांचा पट्टा पायी चालून त्यांनी सामान्य जनतेशी संवाद साधला; कधी रमझानचे रोजे त्यांनी एका सबवे ट्रेनमध्ये केवळ बरिटो खाऊन सोडले. मोफत बससेवा; सर्वसामान्यांना परवडतील अशा किंमतीत किराणा मालाची दुकाने, श्रीमंतांवर जास्त कर, द्वेषमूलक गुन्हे रोखण्यासाठीच्या अंदाजपत्रकात आठशे टक्क्यांची वाढ अशी आश्वासने त्यांनी दिली आहेत. क्यूमो यांना ज्यांनी प्रचारनिधी दिला त्यांत १६ अब्जाधीश होते; तर सुमारे वीस हजार व्यक्तींनी दिलेल्या रकमेतून ममदानी यांनी प्रचारनिधी उभा केला. वरिष्ठ नेते बर्नी सँडर्स यांचे समर्थन ममदानी यांना लाभले असले तरी प्रचारात गुंतलेले सुमारे सत्तावीस हजार स्वयंसेवक हीच ममदानी यांची खरी ताकद.
न्यू यॉर्क शहराचे अंदाजपत्रक ११५ अब्ज डॉलरचे आहे. सुमारे तीन लाख कर्मचारी महापालिकेत काम करतात. हा सर्व व्याप सांभाळायचा तर अनुभव हवा. त्या अनुभवाचा ममदानी यांच्यापाशी अभाव. ममदानी यांच्यावर शरसंधान करण्यासाठी क्यूमो यांनी त्याच मुद्याचे हत्यार वापरले. पण वादचर्चेत (डिबेट) ‘आपल्याला कधीही नाचक्कीमुळे राजीनामा द्यावा लागलेला नाही; महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे कोणतेही आरोप आपल्यावर नाहीत’ इत्यादी वाग्बाण सोडत ममदानी यांनी क्यूमो यांना आरसा दाखविला. याचे कारण क्यूमो यांच्यावर ते गव्हर्नर असताना हे आरोप झाले होते आणि पुढे ते सिद्धही झाले होते. कोरोनाच्या काळात विविध रुग्णालयांमध्ये किती रुग्णांचे मृत्यू झाले त्याची माहिती क्यूमो यांनी दडवून ठेवल्याचाही आरोप झाला होता.
समाजमाध्यमांवर ममदानी लोकप्रिय आहेत. त्यांचे लक्षावधी चाहते तेथे आहेत. ममदानी हे उत्तम रॅपर आहेत. २०१५ मध्ये त्यांनी रॅप संगीत रचण्यास सुरुवात केली. यंग कार्डमम् या नावाने ते संगीत रचना करीत. आपल्या आजीवर बेतलेले ’नानी’ हे रॅप गाणे २०१९ मध्ये त्यांनी प्रसृत केले होते. भांडवलशाही आणि उजवीकडे झुकलेल्या अमेरिकेत ममदानी यांनी डावा आणि इस्रायलच्या कथित उन्मादाच्या विरोधातील सूर लावला आहे. प्रश्न त्यांच्या आताच्या काही वादग्रस्त भूमिकांमध्ये ते महापौर म्हणून निवडून आल्यावर बदल होणार का हा आहे.
नोव्हेंबर महिन्यात ममदानी यांची लढत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कर्टिस स्लीवा व विद्यमान महापौर पण आता डेमोक्रॅट पक्षाऐवजी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे एरीक अॅडम्स यांच्याशी होईल. न्यू यॉर्क हा डेमोक्रॅट पक्षाचा बालेकिल्ला समजाला जातो. पक्ष सदस्य नोंदणीत डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन पक्ष यांचे प्रमाण आठास एक असे आहे यावरून त्याची कल्पना येईल. त्यामुळेच ममदानी हेच न्यू यॉर्क शहराचे पुढचे महापौर होणार हे पक्के मानले जात आहे. १९१४ मध्ये बॉय मेयर अशी उपाधी मिळालेले जॉन मिशेल हे वयाच्या ३४ व्या वर्षी न्यू यॉर्क शहराचे महापौर झाले होते. तेंव्हा सर्वांत तरुण महापौर होण्याचा मान त्यांनी पटकावला होता. ममदानी येत्या ऑक्टोबर महिन्यात ३४ वर्षांचे होतील आणि महापौर झाले तर मिशेल यांच्या पंक्तीला ते जाऊन बसतील. पण त्यापेक्षाही झोरान ममदानी यांनी निर्माण केलेल्या अपेक्षा पाहता ते सर्वांत कार्यक्षम महापौर ठरतात का हा त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्याचा खरा निकष असेल.
Related
Articles
अन्यथा अणुयुद्ध भडकले असते...
23 Jul 2025
सूरज चव्हाण यांची युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी
22 Jul 2025
भारतीय महिलांचा मोठा विजय
20 Jul 2025
‘टायगर कॉरिडॉर’च्या दृष्टिकोनातून निलगिरी महत्वपूर्ण
22 Jul 2025
शाळांच्या धोकादायक इमारतींची होणार पाहणी
26 Jul 2025
कर्नाटकातील कोट्यवधींच्या गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी
23 Jul 2025
अन्यथा अणुयुद्ध भडकले असते...
23 Jul 2025
सूरज चव्हाण यांची युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी
22 Jul 2025
भारतीय महिलांचा मोठा विजय
20 Jul 2025
‘टायगर कॉरिडॉर’च्या दृष्टिकोनातून निलगिरी महत्वपूर्ण
22 Jul 2025
शाळांच्या धोकादायक इमारतींची होणार पाहणी
26 Jul 2025
कर्नाटकातील कोट्यवधींच्या गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी
23 Jul 2025
अन्यथा अणुयुद्ध भडकले असते...
23 Jul 2025
सूरज चव्हाण यांची युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी
22 Jul 2025
भारतीय महिलांचा मोठा विजय
20 Jul 2025
‘टायगर कॉरिडॉर’च्या दृष्टिकोनातून निलगिरी महत्वपूर्ण
22 Jul 2025
शाळांच्या धोकादायक इमारतींची होणार पाहणी
26 Jul 2025
कर्नाटकातील कोट्यवधींच्या गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी
23 Jul 2025
अन्यथा अणुयुद्ध भडकले असते...
23 Jul 2025
सूरज चव्हाण यांची युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी
22 Jul 2025
भारतीय महिलांचा मोठा विजय
20 Jul 2025
‘टायगर कॉरिडॉर’च्या दृष्टिकोनातून निलगिरी महत्वपूर्ण
22 Jul 2025
शाळांच्या धोकादायक इमारतींची होणार पाहणी
26 Jul 2025
कर्नाटकातील कोट्यवधींच्या गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी
23 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर