तालिबान सरकारला रशियाची मान्यता   

मॉस्को : रशियाने अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला  मान्यता दिली आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने तालिबानने पाठवलेल्या नवीन राजदूताचे अधिकृत दस्तऐवज स्वीकारले आहेत. तालिबान सरकारला पाठिंबा देणारा रशिया हा जगातील पहिला देश आहे.
   
रशियन सरकारने तालिबानने नियुक्त केलेले नवीन अफगाण राजदूत गुल हसन यांना स्वीकारले आहे. या संदर्भात रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवदेन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला विश्वास आहे की, इस्लामिक अमीरात ऑफ अफगाणिस्तानच्या सरकारला अधिकृत मान्यता देण्याच्या निर्णयामुळे दोन्ही देशांतील विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याच्या विकासाला चालना मिळेल. दरम्यान, रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री आंद्रे रुडेन्को यांनी मॉस्कोमध्ये झालेल्या एका कार्यक्रमानंतर अफगाण राजदूत गुल हसन यांची भेट घेत त्यांचे प्रमाणपत्र स्वीकारले आहे. 
 
दहशतवादाविरुद्ध लढा, अमली पदार्थांचा चोरटा व्यापार आणि सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर रशिया काबूल सरकारला सहकार्य करेल. याशिवाय, ऊर्जा, शेती, वाहतूक आणि पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रात व्यवसाय संधी देखील उपलब्ध करू, असेही रशियन परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, अफगानिस्तानमध्ये २०२१ मध्ये तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून इतर कोणत्याही देशाने तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता अद्याप दिलेली नाही. 

Related Articles