पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात ३० घुसखोर ठार   

पेशावर : अफगाणिस्तानातून वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या ३० बंडखोरांना पाकिस्तानी सैन्याने ठार केले. पाकिस्तान लष्कराच्या माध्यम प्रमुखांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
 
इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने म्हटले आहे की, सुरक्षा दलांनी मंगळवार आणि बुधवारी रात्री उत्तर वझिरिस्तान जिल्ह्यातील हसन खेल भागात अफगाणिस्तानच्या बाजूने सीमापार घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले. जलद कारवाईत सुरक्षा दलांनी पाकिस्तानात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या ३० दहशतवाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. हे यश आमच्या सतर्क गुप्तचर नेटवर्कच्या प्रभावीपणाचे आणि आमच्या सैन्याचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.पाकिस्तानविरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी परदेशी घटक आपल्या भूमीचा वापर करणार नाहीत, याची खात्री करण्याची जबाबदारी अफगाणिस्तानने घ्यावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.  
 
दरम्यान, २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यापासून पाकिस्तानच्या सीमेवरील भागात हिंसाचारात मोठी वाढ झाली आहे.   पाकिस्तानविरुद्ध हल्ल्यांसाठी बंडखोर पाकिस्तानच्या भूमीचा वापर करत असल्याचे पाकिस्तान लष्कराने म्हटले आहे. मात्र, हा दावा तालिबानने नाकारला आहे. एएफपीच्या आकडेवारीनुसार, खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये  २०२५ च्या सुरुवातीपासून बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये २९० नागरिक आणि काही सैनिक मारले गेले आहेत.

Related Articles