मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानातील कामकाज करणार बंद   

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या भूमीत २५ वर्षे तंत्रज्ञानाचे पीक पेरल्यानंतर मायक्रोसॉफ्टने अखेर पाकिस्तानला रामराम म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जगभरातील ९ हजार कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची तसेच पाकिस्तानमधील कार्यालयाला कुलूप लावण्याची योजना आखली आहे.मायक्रोसॉफ्टने ७ मार्च २००० रोजी पाकिस्तानमध्ये आपले कामकाज सुरू केले होते. कंपनीने देशभरात संगणक प्रयोगशाळा स्थापन केल्या, डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन दिले आणि ई-गव्हर्नन्सला पाठिंबा दिला. 
 
बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातही अनेक योगदान देण्यात आले. तथापि, पाकिस्तानमध्ये कंपनीची व्याप्ती मर्यादित होती. केवळ एक संपर्क कार्यालय आणि बंद होताना पाच कर्मचारी होते. मायक्रोसॉफ्टच्या सेवा प्रामुख्याने भागीदार मॉडेलद्वारे चालवल्या जात होत्या, ज्याचे व्यावसायिक व्यवस्थापन आयर्लंड आणि इतर प्रादेशिक कार्यालयांमध्ये होते. सरकारी क्षेत्रात मायक्रोसॉफ्टने २०० हून अधिक उच्च शिक्षण संस्थांना तंत्रज्ञानदेखील पुरवले आहे. मात्र आता २५ वर्षांनंतर मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानमधील आपले कामकाज बंद करणार आहे.  
 
मायक्रोसॉफ्टने पाकिस्तान सोडण्यामागे अनेक कारणे आहेत. कंपनीची जागतिक पुनर्रचना आणि खर्चात कपात हे सर्वात मोठे कारण आहे. मायक्रोसॉफ्ट आता लहान बाजारपेठांऐवजी क्लाउड आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. याशिवाय, पाकिस्तानमधील आर्थिक संकट, परकीय चलनाची कमतरता, उच्च कर, गुंतागुंतीचे व्यापार नियम आणि सतत बदलणारी राजकीय परिस्थिती यामुळे कंपनीला येथे टिकून राहणे अशक्य झाले आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्टचा हा निर्णय पाकिस्तानच्या भविष्यासाठी चिंताजनक असल्याचे माजी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी म्हटले आहे.  

Related Articles