हिमाचल प्रदेशात पावसाचे ४३ बळी; ३७ बेपत्ता   

सिमला : मान्सून सुरू झाल्यापासून हिमाचल प्रदेशात ढगफुटी,  पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे ४३ जणांचा मृत्यू झाला. तर ३७ जण बेपत्ता आहेत. २० जून रोजी  हिमाचल प्रदेशात मान्सून दाखल झाला. तेव्हापासून ढगफुटी, पूर आणि दरड कोसळण्याच्या मोठ्या घटना घडल्या. या दुर्घटनांमध्ये राज्याचे पाच हजार कोटींचे नुकसान झाले आहे. ४३ जणांपैकी १४ जण ढगफुटीत, आठ जण अचानक आलेल्या पुरात, एकाचा दरड कोसळून  तर सात जणांचा बुडून मृत्यू झाला. मंडी जिल्ह्यात सर्वाधिक १७ मृत्यूची नोंद झाली आहे, तिथे ढगफुटी, अचानक पूर आणि दरड कोसळण्याच्या दहा घटना घडल्या होत्या. याच जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या ३१ नागरिकांचा शोध अद्यापही सुरू आहे.
 
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या कर्मचार्‍यांनी शुक्रवारी मुसळधार पावसामुळे भरड, देजी, पायला आणि रुक्चुई गावांमध्ये अडकलेल्या ६५ नागरिकांना वाचवले.मुसळधार पावसाने पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. १५० हून अधिक घरे, १०६ गोठे, ३१ वाहने, १४ पूल आणि अनेक रस्त्यांचे नुकसान झाले आहेत तर विविध घटनांमध्ये १६४  जनावरांचा मृत्यू झाला आहे. स्थलांतरित नागरिकांसाठी पाच मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. त्यापैकी ३४८ नागरिक एकट्या मंडी जिल्ह्यातील आहेत.
   
दरम्यान, राज्य आपत्कालीन दलाने सांगितले की, मंडीमधील १५६, सिरमौरमधील ४९ आणि कुल्लू जिल्ह्यातील ३६ असे २८० रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. राज्यात एकूण ३३२ ट्रान्सफॉर्मर आणि ७८४ पाणीपुरवठा योजना विस्कळीत आहेत. स्थानिक हवामान विभागाने ’ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार शनिवार ते मंगळवार या कालावधीत राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles