माउली, तुकोबारायांच्या पालखीचा वाखरीत रंगला रिंगण सोहळा   

सूर्यकांत आसबे 

सोलापूर : पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रिंगण बाजीराव विहिरीजवळ रंगले. आनंदाने वारकरी विठुनामाच्या जयघोषात नृत्यामध्ये तल्लीन झाले होते.बाजीराव विहीर परिसरात रिंगणाचा सोहळा वारकर्‍यांनी अनुभवला. या भव्यदिव्य रिंगण सोहळ्यामुळे शेकडो किलोमीटर अंतर पायी आलेल्या वारकर्‍यांचा शीण गेला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून निघालेल्या संतांच्या पालख्या मंगळवारी वाखरीत दाखल झाल्या. दरम्यान, द्वारी एक वाजता भंडीशेगाव येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. त्यापूर्वी संत सोपान काका यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे निघाला. त्यानंतर पिराची कुरोली येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा निघाला होता.
 
पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांनी संतांच्या पालख्यांचे दर्शन घेत आपापल्या सोहळ्यात सहभाग घेतला. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा उभ्या रिंगणासाठी बाजीराव विहिरीसमोर आला. उड्डाणपुलाच्या शेजारील सर्व्हिस रस्त्यालगत लागलेले रिंगण पाहण्यासाठी वारकर्‍यांनी उड्डाणपुलावर गर्दी केली होती. दुपारी साडेतीन वाजता उभे रिंगण पूर्ण झाले. त्यानंतर माउलीचा सोहळा गोल रिंगणासाठी शेजारील मोकळ्या रानात दाखल झाला. त्यापूर्वी मैदानावर वारकर्‍यांनी फुगड्या, सूरपाट्यांच्या खेळासह भारुडांचे कार्यक्रम सुरू केले होते. पालखी सोहळ्यातील शेवटचे गोल रिंगण पाहण्यासाठी वाखरीच्या पालखी तळावर दाखल झालेल्या विविध संतांच्या दिंडी सोहळ्यातील हजारो वारकरी बाजीराव विहीर परिसरात दाखल झाले होते. सायंकाळी पाच वाजता माउलींचा सोहळा रिंगणस्थळी आला. यानंतर सेवेकर्‍यांनी टाळ-मृदंगांच्या तालावर खांद्यावरून पालखी नाचवत रिंगण पाहण्यासाठी थांबलेल्या वारकर्‍यांच्या भोवतीने रिंगण घातले. त्यानंतर सोहळ्याचे चोपदार बाळासाहेब चोपदार, शितोळे सरकार यांच्यासह मानकर्‍यांनी रिंगणाची पाहणी केली. त्यानंतर मानाच्या दिंड्यांनी झेंडा घेऊन रिंगणात प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर अश्वस्वार रिंगणाला सुरुवात झाली. पहिल्या फेरीनंतर माउलींच्या अश्वाने स्वाराच्या अश्वाला पाठीमागे टाकत सुसाट वेगामध्ये रिंगण पूर्ण केले. यावेळी उपस्थित वारकर्‍यांनी माउली... माउलीचा गजर केला.

Related Articles