ओतूर बसस्थानक ते ब्राह्मणवाडाचौक मार्गाची दुरवस्था   

ओतूर, (वार्ताहर) : ओतूर ब्राह्मणवाडा जिल्हा मार्गावर ओतूर बसस्थानक ते ब्राह्मणवाडाचौक १०० मीटर मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. तसेच हा मार्ग जागोजागी खचल्याने त्यात पाणी साठल्याने मातीची रबडी तयार होऊन मार्ग काढताना पायी चालणारे वाटसरू व वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डे बुजवून तसेच खचलेल्या मार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी वाहनधारकातून होत आहे.या रस्त्याला खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र, या समस्येकडे संबंधित विभागाकडून डोळेझाक केली जात आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही लक्ष घातले जात नाही. अधून-मधून थोड्या प्रमाणात रस्त्यावर डागडुजी करण्यात येते. परंतु रस्त्याचे नियमित काम होत नाही पावसाळ्यामुळे हा रस्ता अधिकच खराब झाला आहे. 
 
वाहनचालकांना ये जा करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे.  रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्याला मालवाहू गाड्यांची वाहतूकही होत असते खड्यात व चिखलात पडून अपघात होऊन जीव गेल्यानंतरच संबंधित खात्याला जाग येणार का ? असा प्रश्न या ठिकाणी पाहिल्यावर पडत आहे. वाहनधारकांचे थोडेफार लक्ष विचलित झाले आणि वाहन खड्ड्यात गेले तर अपघात निश्चित असे चित्र असून हे खड्डे अनेक चार चाकी व दुचाकीस्वारांच्या जीवावरच बेतत आहे. या रस्त्यावर बर्‍याच ठिकाणी खड्ड्यांचे व चिखलाचे साम्राज्य असल्याने साईड पट्या आहेत की नाही हे लक्षातच येत नाही. अशा एक ना अनेक अडचणींवर मात करत वाहनधारकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. तरी या रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित दुरुस्त करून घ्यावेत आणि होणारी हानी टाळावी, अशी मागणी स्थानिक व प्रवाशी वर्गातून होत आहे.
 
कित्येक वर्ष झाले रस्त्याचे काम प्रलंबित असून संबंधित विभागाने खरोखर या गोष्टीची दखल घेणे गरजेचे आहे. या रस्त्याला पावसाळा आला की येण्या जाण्यासाठी जीकरीचे झाले आहे.
- दत्तात्रय डुंबरे, उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ, ओतूर.

Related Articles