आंबोडीमधील पुलाला पहिल्याच पावसात गळती   

करोडो रुपये पाण्यात; ठेकेदार मालामाल

निलेश जगताप
 
सासवड : सासवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय व पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाचे रुंदीकरणास पर्याय म्हणून सासवड शहरातील चंदनटेकडी ते बोरावके मळा कॉर्नर असा बाह्यवळण रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र याच रस्त्यावरील सासवड-माळशिरस रस्त्यासाठी तयार करण्यात आलेल्या अंडरपास पुलाला पहिल्याच पावसात गळती लागली आहे. 
 
याठिकाणी या गळतीने वर पुलावरून वाहतूक करणारे व सासवड-माळशिरस रस्त्यावर प्रवास करणारे वाहनचालक व प्रवासी यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पहिल्याच पावसात या पुलाला गळती लागल्याने पुलाच्या व या संपूर्ण रस्त्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. करोडो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या पुलाच्या गळतीमुळे करोडो रुपये पाण्यात ठेकेदार मालामाल अधिकारी मूग गिळून गप्प अशीच अवस्था झाली आहे. मुळात ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असेल तर या ठेकेदारावर कारवाई होणे गरजेचे आहे. 
 
शिवाय या रस्त्याच्या देखरेखीसाठी नियुक्त अधिकारी यांनी देखील हलगर्जीपणा व कामचुकारपणा केला आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच जर असे असेल तर या अधिकार्‍यांवर कारवाई होणे देखील तितकेच गरजेचे आहे.संपूर्ण बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासून व या रस्त्यावरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणे गरजेचे आहे. कारण, पहिल्याच पावसात जर या पुलाला गळती लागली असेल तर हा पूल खरंच सुरक्षित आहे का? असा देखील प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे शासकीय तज्ज्ञांच्या समितीमार्फत या संपूर्ण रस्त्याची तपासणी होणं गरजेचं आहे व यामध्ये दोषी आढळणारे अधिकारी ठेकेदार यांच्यावर कारवाई होणं देखील गरजेचे आहे.
 
पुलाची प्रत्यक्ष पाहणी करून त्याठिकाणी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. 
- अभिजीत औटी, व्यवस्थापक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
 
बाह्यवळण रस्त्यावरील पुलाची होणारी पाण्याची गळती ही धोकादायक नाही अशी गळती होत असते. 
- राजेंद्र ढगे, व्यवस्थापक टी अँड टी कंपनी ठेकेदार कंपनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
 
पहिल्याच पावसात पुलाला गळती कशी?
 
• सासवड येथील चंदनटेकडी ते बोरावके मळा कॉर्नर या बाह्यवळण रस्त्याच्या पुलाची गळती बाबतीत अधिकारी व ठेकेदार कंपनीचे कर्मचारी एकीकडे सांगतात की पुलाची गळती ही धोकेदायक नाही, मग प्रश्न हा उपस्थित होतो की पुलाला गळती लागली तरी कशी?

Related Articles