कोयना धरणात तीन टीएमसीने वाढ   

सातारा, (प्रतिनिधी) : कोयना धरण पाणलोटक्षेत्रासह तालुक्यात संततधार सुरू असून आज महाबळेश्वरला १०९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जलाशयात २४ तासांत तीन टीएमसी पाणी आले आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा ६० टीएमसी झाला आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ८४ (१७२८) मिलिमीटर, नवजाला ८६ (१५१०) मिलिमीटर आणि महाबळेश्वरला १०९ (१६५२) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलाशयात प्रतिसेकंद ३३ हजार ९१२ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे.
 
तारळी धरण ८० टक्क्यावर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प म्हणून मुरुड (ता. पाटण) येथे बांधलेल्या तारळी धरणाची ओळख आहे. पावसाळ्यात कोयना, कण्हेर, उरमोडीबरोबरच तारळीकडेही प्रशासनासह शेतकर्‍यांचे लक्ष असते. मे महिन्यापासून धरण परिसरात पावसाची अखंड रिपरिप सुरू असल्याने धरण ८० टक्क्यांवर गेले आहे. धरणाची सांडवा पातळी गाठण्यासाठी केवळ तीन मीटर शिल्लक असल्याने येत्या दोन दिवसांत पाण्याचा विसर्ग सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुमारे दीड महिना पावसाची संततधार सुरू आहे. ५.८५ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या धरणात आजमितीस ७६ टक्के पाणीसाठा आहे. पाणी पातळी ७०३ मीटर आहे. सध्या धरणात २२११ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. ७०६ मीटरला धरणाची सांडवा पातळी आहे. त्यामुळे दोन दिवसांत विसर्ग होण्याची शक्यता आहे.

Related Articles