भूखंड गैरव्यवहारात उपविभागीय अधिकारी निलंबित   

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई, (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील  भूखंड गैरव्यवहार प्रकरणी  उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांचे तात्काळ निलंबन करण्यात येत असल्याची घोषणा महसूल  चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. तसेच आठ मुद्रांक अधिकार्‍यांच्या  विभागीय चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाईचे संकेत  दिले. तसेच स्टॅम्पवेंडर जाकीर आणि आरिफ अब्दुल लतीफ यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
भाजपचे आमदार  गोपीचंद पडळकर यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात  मौजे संगमेश्वर येथील सिटी सर्व्हे क्र. १४४ अ आणि मौजे गुगळगाव येथील गट क्र. २५३ यांच्या बिनशेती परवानगीशिवाय झालेल्या गैरव्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना,  २००२ च्या परिपत्रकानुसार भूखंड किंवा शेतीच्या अदलाबदलीसाठी जमिनी सलग असणे आवश्यक आहे. परंतु, उदय किसवे यांनी संगमेश्वरची जमीन गुगळगावला आणि गुगळगावची जमीन संगमेश्वरला स्वॅप करून नियमांचा भंग केला. यामुळे त्यांचे निलंबन करत एका महिन्याच्या आत विभागीय चौकशी पूर्ण करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.
 
या जमिनीचे १६ विभाग आणि २७२ तुकडे करून तुकडेबंदी कायद्याचे तसेच एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन झाले आहे. २०१३ ते २०१९ या काळात २५८ अनधिकृत दस्त नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप पडळकर यांनी यावेळी केला. त्यावर या प्रकरणात मुद्रांक अधिकारी भुरके, गावित, कापडणे, गुप्ते, हिरे, कळसकर, मोतीराळे आणि वाणी यांनी चुकीच्या दस्तनोंदणीद्वारे अधिकाराचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. 
 
या सर्व आठ अधिकार्‍यांवर प्राथमिक चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी कारवाई पूर्ण करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.या गैरव्यवहारात स्टॅम्प वेंडर जाकीर आणि आरिफ अब्दुल लतीफ यांनीही साथ दिल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्यावर फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही  बावनकुळे यांनी  सभागृहात जाहीर केले.

Related Articles