तालिका अध्यक्षांच्या राजकीय शेरेबाजीवर आक्षेप   

पीठासीन अधिकार्‍यांनी नियमांच्या चौकटीत काम करावे : नार्वेकर

मुंबई,(प्रतिनिधी) :  शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांबाबत विरोधकांनी  गुरुवारी विधानसभेत मांडलेल्या नियम २९३ च्या प्रस्तावावर तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांच्या राजकीय शेरेबाजीला विरोधी पक्षाने शुक्रवारी आक्षेप घेतला. विरोधी पक्षाचा हा आक्षेप मान्य करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पीठासीन अधिकार्‍यांनी  संविधानाने दिलेल्या आदेशाचे जे नियम आहेत त्या चौकटीत राहूनच काम करणे आवश्यक आहे. सभागृहात अध्यक्ष या आसनाचा वापर राजकीय हेतूने होणार नाही,  असे नार्वेकर यांनी सांगितले.
 
नियम २९३ अन्वये दिलेल्या प्रस्तावावर बोलण्यासाठी विरोधी पक्षाने  नावे  दिली होती. पण काही आमदार उपस्थित नसल्याने  चेतन तुपे यांनी राजकीय शेरेबाजी केली. त्याला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला. या प्रस्तावावर चर्चा होत असताना कृषिमंत्री, त्या विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते.  तरीही  कामकाज सुरू  ठेवले होते. पण काही सदस्य उपस्थित नसल्याने चेतन तुपे यांनी अध्यक्षांच्या स्थानावर बसून सरकारची भूमिका मांडली.  असा त्यांना अधिकार आहे का? अध्यक्षपदाची एक प्रतिष्ठा आहे. असे  असताना तिथून राजकीय भाषण होणे योग्य नाही. ३० वर्षे या सभागृहात काम करताना असा प्रकार घडलेला नाही, असे  वडेट्टीवार म्हणाले.
 
तालिका सभाध्यक्ष बसले असले तरी त्यांना अध्यक्ष म्हणून मानून मान दिला जातो.  पण विरोधी पक्षातील काही सदस्य उपस्थित नाहीत म्हणून राजकीय टिप्पणी केली जाते. सभागृहाचे कामकाज नीट व्हावे ही जबाबदारी सरकारची असते. ज्या विभागाचा प्रस्ताव असतो त्या विभागाचे मंत्री सभागृहात उपस्थित आहेत की नाही हे पाहणे संसदीय कामकाज मंत्र्यांचे काम असते. अशावेळी सभागृहात सर्वोच्च स्थानावरून सभागृहाची प्रथा परंपरा किंवा संकेत पाळले पाहिजे. राजकीय भाष्य करणार्‍यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार आहे का? याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा,  अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

Related Articles