पेशव्यांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार   

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार
 
बाजीरावांंच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्घाटन 
 
पुणे  : पुण्याची भूमी ही स्वराज्याच्या संस्काराचे उगमस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे संस्कार रूजविले. मराठा साम्राज्याचे तुकडे झाल्यानंतर पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले. अफगाणिस्तानापासून ते बंगाल आणि कटकपर्यंत साम्राज्याचा विस्तार केला. थोरले बाजीराव पेशव्यांनी ४१ युद्धे केली,  पण एकही हरले नाहीत. निजामाविरुद्ध पालखेड येथील मराठ्यांचे युद्ध अविश्वसनीय होते, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी  काढले. 
 
खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण काल झाले. त्यावेळी शहा बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, लेफ्टनंट जनरल धीरज शेठ, एनडीएचे कमांडंट व्हाईस अ‍ॅडमिरल गुरूचरण सिंह, पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, थोरले बाजीराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार मेधा कुलकर्णी, सीटी ग्रुपचे अनिरूद्ध देशपांडे आदी उपस्थित होते. 
 
शहा म्हणाले, मराठा साम्राज्याचे तुकडे झाले तरी पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यांनी शेजारच्या संस्थांनातही प्रशासन उत्तमप्रकारे राबविले.  शिवरायांच्या वारसांनी स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. छत्रपती संभाजी महाराज व ताराराणी यांनी परंपरा पुढे नेली. बुंदेलखंड, तंजावर आणि गुजरातपासून अफगाणिस्तान, कटकपर्यंत स्वराज्याचा मोठा विस्तार केला. छत्रपती शिवराय आणि बाजीरावांचा इतिहास आठवतो, त्यावेळी मला समाधान मिळते.
 
पेशवे यांच्या शौर्याविषयी शहा म्हणाले, ‘युद्धकलेचे काही नियम हे कधीही बदलत नाही. युद्धात व्यूहरचनेचे महत्त्व गरजेचे असते. समर्पण, देशभक्ती आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बलिदानाची भावनाच विजय मिळवून देते. या सगळ्या गुणांचे उत्कृष्ट उदाहरण शोधायचे असेल, तर ते केवळ बाजीराव पेशव्यांमध्येच मिळेल. अनेकजण असे म्हणतात की, शिवरायांनी सुरू केलेली स्वातंत्र्याची लढाई पेशव्यांनी ती पुढे सुरू ठेवली नसती तर आज भारताचे मूळ स्वरूप टिकलेच नसते. पराभव शक्य आहे, असे मानल्या जाणार्‍या लढायादेखील थोरल्या बाजीरावांनी जिंकल्या आहेत. पालखेडच्या विजयाचा बारकाईने विचार केल्यास निजामासमोरील विजय अकल्पनीय विजय होता. विशेष म्हणजे, न थकता बाजीरावांनी गुलामीची सगळी निशाणे नष्ट केली.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रबोधिनीत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. ही आनंदाची बाब आहे. शिवरायांनी विजीगिषु वृत्तीने स्वराज्याची ज्योत सामान्य मराठी माणसाच्या रक्तात फुलविली. सर्व दिशांना हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना त्यांनी वेगवान रणनीती अवलंबिली. आज अनेक महानायकांचा इतिहास पुसला गेला आहे. पेशवे यांच्या भव्य पुतळ्याच्या उभारणीतून मराठ्यांचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भूषण गोखले, कुंदनकुमार साठे, चिंतामणी क्षीरसागर, पुष्करसिंह पेशवा आणि श्रीपाद करमकर यांनी स्वागत केले. मोहन शेटे यांनी सूत्रसंचालन केले, तर कुंदनकुमार साठे यांनी आभार मानले. 
 
बाजीराव स्वराज्यासाठी लढले
 
शहा म्हणाले, बाजीरावांच्या सैन्यात एका शिपायासोबत तीन घोडे असायचे. एक घोडा दमला की, दुसर्‍या घोड्यावर स्वार होऊन शत्रूवर तुटून पडायचे. त्यात भलेभले पराभूत झाले. अवघ्या कोवळ्या वयात त्यांनी ४१ युद्धे लढली. त्यात त्यांना यशच आले. एकाही युद्धात ते पराभूत झाले नाहीत. बाजीराव पेशवे हे स्वत:साठी कधीच लढले नाही. स्वराज्य आणि देशासाठी ते कायम लढत राहिले, ही कौतुकास्पद बाब आहे. 
 
विश्वात भारताच्या निर्मितीचे लक्ष 
 
स्वराज्यासोबतच महान भारताची रचनादेखील छत्रपती शिवाजी महाराजांची कल्पना आहे. भारताच्या स्वातंत्र्याला १०० वर्ष पूर्ण होतील, तेव्हा सार्‍या विश्वात भारताची निर्मिती हे आपले लक्ष्य असले पाहिजे. पुरुषार्थ, समर्पण आणि बलिदानासाठी कोणी प्रेरणास्थान असेल, तर ते केवळ श्रीमंत बाजीराव पेशवे हेच आहेत, असेही शहा यांनी नमूद केले.  
 
’ऑपरेशन सिंदूर’ हे उत्तम उदाहरण 
 
छत्रपती शिवाजी महाराज आणि थोरले बाजीराव पेशव्यांचा पराक्रम व बलिदान आठवतो, तेव्हा मनाला ऊर्जा मिळते. माझ्यातील नैराश्य गायब होते. बिकट परिस्थितीत त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आहेत. स्वराज्याच्या संघर्षासाठी ते कायम तत्पर होते. स्वराज टिकविण्यासाठी युद्धात त्यांना सैन्यांची मोलाची साथही मिळाली. त्यामुळे ते युद्धात अजिंक्यच राहिले. ’ऑपरेशन सिंदूर’ हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल, असेही शहा यांनी सांगितले. 

Related Articles