एकनाथ शिंदे यांची ‘जय गुजरात’ची घोषणा   

पुणे : राज्यात मराठी हिंदीवरून वाद सुरू असताना उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात शुक्रवारी ‘जय गुजरात’ असा नारा दिला. या घोषणेवरून नवा वाद सुरू झाला आहे. मराठी भाषेच्या अस्मितेवरून वातावरण तापले असताना या घोषणेमुळे वादात भर पडली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा काल पुणे दौर्‍यावर होते. या वेळी एका कार्यक्रमात शिंदे यांनी भाषण केले. भाषण संपतानाच शिंदे यांनी धन्यवाद, जय महाराष्ट्र म्हटले आणि त्यांनी पुन्हा ‘जय गुजरात’ असा नारा दिला. यावरून आता वाद सुरू झाला आहे. याच कार्यक्रमात अमित शहा यांच्यासाठी शिंदे यांनी एक शेर ऐकविला. ’आपके बुलंद इरादोंसे तो चट्टाने भी डगमगाती है, दुश्मन क्या चीज है, तुफान भी अपना रुख बदल देता है, आपके आने से यहाँ की हवा का रुख बदल जाता है, आपके आनेसे हर शख्स आदब से झुक जाता है !’ त्याचे याचेही राजकीय संदर्भ जोडले जात आहेत. 
 
‘जय गुजरात’चा वाद निरर्थक : फडणवीस
 
चिकोडी येथे पूर्वी एक कार्यक्रम झाला होता. त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार ‘जय महाराष्ट्र, जय कर्नाटक’ म्हणाले होते. मग शरद पवार यांचे कर्नाटकवर जास्त प्रेम आहे असे आपण म्हणायचे का? आपण ज्या कार्यक्रमात जात असतो त्यानुसार बोलत असतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’ म्हणाले तर त्यांचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झाले असे आपण कसे म्हणणार? मराठी माणूस वैश्विक आहे. मराठी माणसाने अटकेपार झेंडे लावले, मुघल सत्ता हटविण्याचे काम मराठी माणसाने केले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Related Articles