वर्षभरात देश नक्षलमुक्त करणार   

अमित शहा; जयराज स्पोर्टस् अँड कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन
 
पुणे : देशात मागील दहा वर्षांत लक्षणीय बदल झाले आहेत. सामाजिक आणि औद्योगिक दृष्टिकोनातून मोठे परिवर्तन घडले आहे. देशातील दहशतवाद संपलेला आहे. मणिपूरमधील आंदोलन आता संपले आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवाद संपणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केली.
 
श्री पूना गुजराती बंधू समाजच्या जयराज स्पोर्टस् अँड कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन आज गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कोंढवा बुद्रुक येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, श्री पूना गुजराती बंधू समाजचे अध्यक्ष नितीन देसाई, कार्यकारी संचालक राजेश शहा, नैनेश नंदू, जयंत शहा, राजेंद्र शहा, वल्लभ पटेल, सुजय शहा आदी उपस्थित होते. 
 
शहा म्हणाले, देशात दोन पंतप्रधान, दोन संविधान आणि दोन झेंडे नकोत, म्हणून कलम ३७० रद्द करण्यात आले. २० हजार गावांमध्ये वीज नव्हती; तेथे वीज पोहोचविली. देशातील १५ कोटी जनतेच्या घरात शौचालय उभारले. २०३६ मध्ये भारतात ऑलिंपिक स्पर्धा आयोजित करण्याचा मानस आहे आणि त्या दृष्टीने काम सुरू आहे. स्टार्टअप, उद्योग आणि औद्योगिक क्षेत्रात देश आघाडीवर आहे. जगाला माहिती पुरविण्याचे कार्य भारत करत आहे. २०२७ मध्ये भारत तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही त्यांनी   व्यक्त केला.
 
जगाच्या नकाशावर भारत आशावादी देश म्हणून उदयास येत आहे. मोदी सरकारने देशात आमूलाग्र बदल आणि परिवर्तन घडवून आणले आहे. वीज, शौचालये, आरोग्य यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधा वाढविल्या आहेत. काही काळ मी पुण्यामध्ये भवानी पेठेत राहिलो आहे. त्यामुळे श्री पूना गुजराती बंधू समाजाचे जयराज स्पोर्टस् अँड कन्व्हेन्शन सेंटर कसे असेल, याविषयी माझ्या मनात उत्सुकता होती. गुजराती बांधवांनी उभारलेली ही वास्तू म्हणजे देशातील  गुजराती बांधवांना अभिमान वाटावा, अशीच असल्याचेही शहा यांनी सांगितले. 
 
एकनाथ शिंदे म्हणाले, कोणत्याही शहराला बाजारपेठेशिवाय शोभा नसते. गुजराती समाजाने शहरांमध्ये बाजारपेठा प्रस्थापित करून शहरांना शोभा आणली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राष्ट्रहित अग्रभागी ठेवून राष्ट्रहिताच्या आड येणार्‍या आव्हानांचे संधीत रूपांतर करून देश प्रगतिपथावर नेला. महाराष्ट्राच्या विकासात गुजराती समाजाचे मोठे योगदान असून महाराष्ट्राच्या संस्कृतीत गुजराती समाज समरस आणि एकरूप होऊन गेला आहे. 
 
अजित पवार म्हणाले, गुजराती समाजामुळे महाराष्ट्राची तिजोरी सशक्त होत आहे. गुजराती समाज हा व्यापाराच्या माध्यमातून केवळ पैसा कमवत नाही, तर आपले समाजाचे ऋण लक्षात घेऊन सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. नितीन देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. राजेश शहा यांनी प्रास्ताविक केले.
 
स्वातंत्र्याच्या शताब्दीत देश प्रथम क्रमाकांवर असेल
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत चांद्रयान मोहिमेपासून स्टार्ट अपपर्यंत, आरोग्यापासून शिक्षणापर्यंत, खेळापासून संशोधनापर्यंत अशा सर्वच क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेत आहे. २०४७ मध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्या शताब्दीमध्ये भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश होईल, असा विश्वास गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.
 
लोकमान्यांची गर्जना जीवनमंत्र झाली 
 
स्वातंत्र्य लढ्याचा विचार आणि कृतिशीलतेचे नेतृत्व करण्याचे काम पुण्याने केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, पेशव्यांनी कर्तृत्व गाजविले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ही लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना त्याकाळातील युवकांचा जीवनमंत्र झाली. या मंत्राने देशाच्या कानाकोपर्‍यात स्वातंत्र्य लढ्याची ज्योत वेगाने तेजोमय झाली. लोकमान्यांनी स्वातंत्र्य चळवळीला व्यापक रूप दिले. त्यानंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त असल्याचेही अमित शहा यांनी सांगितले. 

Related Articles