पीएमआरडीए रिंगरोडसाठी तीन गावांची संयुक्त मोजणी प्रलंबित   

पुणे : पीएमआरडीएच्या रिंगरोडसाठीच्या १३ गावांपैकी १० गावांतील भूसंपादनासाठी संयुक्त मोजणीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. उर्वरीत तीन गावांची संयुक्त मोजणी प्रलंबित आहे. भूसंपादनासाठी थेट वाटाघाटीची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
 
राज्य रस्ते विकास महामंडळाने रिंगरोडचे काम सुरु केले आहे. त्या पाठोपाठ आता पीएमआरडीएच्या हद्दीतील ८३ किलोमीटर लांबीचा आणि ६५ मीटर रुंदीचा आहे. या रिंगरोडसाठी सुमारे ११५ हेक्टर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. रस्ते विकास महामंडळ करीत असलेला रिंगरोड हा सोलू गावापर्यंत येत आहे. या ठिकाणी पीएमआरडीएचा रिंगरोड येऊन मिळणार आहे. त्यामुळे १३ गावांतील जमिनीचे संपादन करण्यासाठी पीएमआरडीएने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव दिला होता. त्यानुसार प्रशासनाकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. मोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच भूमी अभिलेख विभागाला प्रस्ताव दिला होता.
 
पीएमआरडीएच्या हद्दीतील वडाची वाडी, भिलारेवाडी, पिसोळी, येवलेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, कदमवाकवस्ती, सोळु, निरगुडी, वडगाव शिंदे, महाळुंगे या गावांची संयुक्त मोजणी प्रस्तावित होती. त्यापैकी येवलेवाडी, जांभुळवाडी आणि कदमवाकवस्ती या ३ गावांची संयुक्त मोजणी अद्याप झालेली नाही.मोजणी झालेल्या गावातील जमिनीच्या मोजणीचे नकाशे नुकतेच जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये ३ गावे वगळता उर्वरीत गावांसाठी थेट खरेदीने भूसंपादनाची कार्यवाही सुरु करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या भूसंपादनासाठी चालू बाजारभावाने मोबदल्याची रक्कम दिली जाणार आहे. मोजणी पूर्ण झाल्यानंतर बाजारमूल्य दर निश्चिती समितीची बैठक होऊन जागेचे दर निश्चित केले जातील. त्यानुसार भूसंपादन प्रक्रिया सुरू होऊन जमीन मालकांना बाजारभावाने रक्कम देण्यात येणार आहे.

Related Articles