थकीत दूध अनुदानाचे २८ कोटी ६३ लाखांचे वाटप पूर्ण   

पुणे : राज्य सरकारने गतवर्षी राबविलेल्या दूध अनुदान योजनेत शेतकर्‍यांना देय असलेल्या अनुदानाचे सुमारे २८ कोटी ६३ लाख ५७ हजार ६८० रूपये एक लाख ६८ हजार ८४८ शेतकर्‍यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आले. उर्वरित सहा कोटी ९३ लाख रूपयांचे अनुदान वितरण फेर तपासणीनंतर वितरीत करण्यात येणार असल्याचे राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी सांगितले.
 
महिला टप्प्यांत म्हणजेच ११ जानेवारी २०२४ ते १० मार्च २०२४ या कालावधीतील प्रत्यक्षात सुमारे ३५ कोटी ५७ लाख ५५ हजार ११० रूपया एवढे अनुदान देणे बाकी राहीले होते. ही रक्कम एक लाख ९४ हजार १४५ शेतकर्‍यांची होती त्यापैकी ज्या प्रकल्पांची भरारी पथकाद्वारे तपासणी व छाननी झालेली आहे. ज्या प्रकल्पांमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळून आलेल्या नाहीत अशा प्रकल्पांमधील देय दूध अनुदान प्रामुख्याने वितरित करण्यात आल्याचे सांगून मोहोड म्हणाले, उर्वरित दूध प्रकल्पांची फेरतपासणी करणे प्रस्तावित आहे. फेर तपासणीनंतरच उर्वरित प्रकल्पांमधील दूध उत्पादक शेतकर्‍यांचे अनुदान वर्ग करण्यात येईल. ज्या प्रकल्पांमध्ये अनियमियता आढळून आलेली आहे. त्या प्रकल्पांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.
 
दूध रूपांतरणासाठीचे अनुदान वितरित
 
सरकारने दूध भुकटी व बटरचे कोसळलेले दर विचारात घेता दूध भुकटी प्रकल्पांना भुकटी निर्यातीसाठी प्रति किलोस ३० रूपये व दूध समारणासाठी प्रति लिटरला एक रूपया ५० पैसे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या योजनेतंर्गत एकूण खाजगी व सहकारी ३२ प्रकल्पांनी भाग घेतला आहे. सहभागी ३२ प्रकल्पांपैकी २१ दूध प्रकल्पांनी आपली माहिती सॉफ्टवेअरमध्ये बिनचुक अपलोड केली. त्यामुळे रूपांतरीत केलेल्या ३८ कोटी ८४ लाख ७६ हजार ६८ लीटर दूधाच्या रूपांतरणासाठी ५८ कोटी २७ लाख १४ हजार ६१ रूपयांएवढे प्रोत्साहन पर अनुदान डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले व अनुदान वितरणाची कार्यवाही सध्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles