भारतीय संघाचा बांगलादेशाचा दौरा रद्द होणार?   

मुंबई : कसोटी, टी-२० मधून निवृत्त झालेले विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना मैदानावर पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. हे दोन्ही खेळाडू आता फक्त एकदिवसाच्या क्रिकेटमध्ये खेळताना दिसतील. भारताचा बांगलादेश दौरा १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. भारत तेथे तीन एकदिवसाचे सामने आणि तीन टी२० मालिका खेळणार होती. या मालिकेत दोघे टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसतील अशी क्रिकेट चाहत्यांना आशा आहे. पण या संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे. ही बातमी वाचल्याने भारतीय संघाच्या चाहत्यांचा नक्कीच हिरमोड होऊ शकतो.
 
मिळालेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा बांगलादेश दौरा रद्द होऊ शकतो. बांगलादेशातील राजकीय परिस्थिती सध्या तरी चांगली नाही. कदाचित म्हणूनच केंद्र सरकारने अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला या दौर्‍यासाठी परवानगी दिलेली नाही. येथील खेळाडूंच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी नाही असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
 
भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात बांगलादेश दौर्‍यावर जाणार होता, पण आता या दौर्‍यावर संकटाचे ढग दाटू लागले आहेत. बांगलादेशमधील सत्ताबदलानंतर तेथील वातावरण खूपच बिघडले आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करून केंद्र सरकार भारतीय संघाला बांगलादेश दौर्‍यावर जाऊ देणार नाही, असे मानले जात आहे. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
 
याशिवाय, बीसीसीआय आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड लवकरच आगामी मालिकेबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात. हा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे, परंतु दोन्ही बोर्ड दौरा रद्द करण्याऐवजी काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यास सहमती दर्शवू शकतात. तसे झाल्यास, चाहत्यांना विराट कोहली आणि रोहित शर्मा एकदिवसीय मालिकेत खेळताना पाहायला मिळतील.

Related Articles