दलाई लामांची निवड कशी झाली   

१४ वे दलाई लामा तेन्झिन द्यात्सो उर्फ ल्हामा थोंडुप यांच्यानंतर ‘दलाई लामा’ हे पद रद्द होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, खुद्द लामा यांनीच ही पद्धत कायम राहणार असून गॅडन फोडरंग ट्रस्ट पुढील दलाई लामांची निवड करेल, असे स्पष्ट केले. ६ जुलै रोजी १४ वे दलाई लामा ९० वर्षांचे होतील. याच मुहूर्तावर ते त्यांचा उत्तराधिकारी जाहीर करणार आहेत. यावर चीनने आक्षेप घेत ‘सुवर्ण कलश’ पद्धतीने दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे चीन आणि दलाई लामा यांच्यात पुन्हा संघर्ष सुरु झाला आहे.
 
कसा निवडला जातो उत्तराधिकारी?
 
दलाई लामांचा पुनर्जन्म होतो, अशी बौद्धांची श्रद्धा आहे. दलाई लामा यांच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारी शोधण्याची पारंपरिक प्रक्रिया दीर्घ आणि गुंतागुंतीची असते. ही प्रक्रिया बौद्ध भिक्षु, तिबेटी सरकार इन-एक्झाइल आणि धार्मिक संस्था पूर्ण करतात.  पुनर्जन्माची मान्यता : तिबेटी बौद्ध धर्मात दलाई लामा निवडण्याची प्रथा शतकानुशतके जुनी आहे. दलाई लामांच्या मृत्यूनंतर ९ महिन्यांनी जन्मलेल्या मुलाचा शोध घेतला जातो किंवा दलाई लामा आपल्या मृत्यूपूर्वी काही संकेत देतात, ज्याच्या मदतीने नवीन दलाई लामांना शोधले जाते. नवीन दलाई लामांचा शोध अनेक वर्षेही चालू शकतो. साधारणपणे, नवीन दलाई लामांना जुन्या दलाई लामांच्या काही वस्तू दाखवल्या जातात. ज्या वस्तू ओळखणार्‍या मुलालाच नवीन दलाई लामा बनवले जाते. त्यानंतर त्यांना काही वर्षांचे शिक्षण दिले जाते आणि परीक्षेचे सर्व टप्पे पार केल्यानंतर त्यांना दलाई लामा बनवण्याची घोषणा केली जाते.
 
सुवर्ण कलश पद्धत : १७९२ मध्ये चीनमधील क्विंग राजसत्तेने सुवर्ण कलश अर्थात ‘गोल्डन अर्न’ या पद्धतीची सुरुवात केली. तिबेटच्या बौद्ध गुरूंच्या निवडीसाठी ही पद्धत वापरण्यात येईल, असे तेव्हा जाहीर करण्यात आले होते. त्यात बौद्ध नेते, दलाई लामा आणि पंचेन लामा यांचा समावेश होता. यात उमेदवारांची नावे चिठ्ठ्यांवर ठेवून या चिठ्ठ्या सुवर्ण कलशात ठेवल्या जात. त्यातून एक चिठ्ठी काढून त्यावरील नावाची घोषणा केली जाई. एकीकडे ही पद्धत दलाई लामांच्या निवडीतील गैरप्रकार टाळण्यासाठी असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे यातून चीन सरकारने दलाई लामा निवडीच्या प्रक्रियेवर आपले वर्चस्व 
कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. 
 
१९५९ मध्ये दलाई लामांनी तिबेट सोडले 
 
ल्हासामध्ये चिनी राजवटीविरुद्ध झालेल्या बंडानंतर १४ व्या दलाई लामांनी १९५९ मध्ये तिबेट सोडले. अरुणाचल प्रदेशच्या मार्गाने ते तिबेटमधून भारतात आले आणि हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळेत  राहू लागले. तेव्हापासून ते भारतातच आहेत. मात्र असे असले तरी तिबेटमधील सर्व धर्मविषयक निर्णय तेच घेतात.
 
लामांवर चीनला हवा कंट्रोल
 
दलाई लामांच्या उत्तराधिकार्‍यावर नियंत्रण ठेवून चीन तिबेटी बौद्ध धर्म आणि तिबेटी लोकांवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तिबेटी लामांच्या पुनर्जन्माला मान्यता देण्याचा अधिकार केवळ आपल्याकडे असल्याचा दावा चीन दीर्घकाळापासून करत आहे. चीनने तिबेटी बौद्ध धर्मातील दुसरे सर्वोच्च आध्यात्मिक नेते म्हणजेच पंचेन लामा, याआधीच जाहीर केले आहेत. चीनच्या या कुरापतींची जराही दखल न घेता दलाई लामांनी गादेन फोड्रांग ट्रस्टवर पुढचा दलाई लामा निवडण्याची जबाबदारी सोपवल्याने चीन संतापला आहे.
 
बौद्ध नेतृत्व भारताकडे वळण्याची भीती 
 
दलाई लामांनी केलेल्या पुनर्जन्मासंबंधीच्या ताज्या घोषणेमुळे चीनच्या मनसुब्यांना मोठा झटका बसला आहे. भारत, नेपाळ, मंगोलिया, रशिया, जपान, श्रीलंका आदी देशांतील बौद्ध अनुयायांचा कल दलाई लामा आणि तिबेटी परंपरेकडे आहे. दलाई लामांचा पुनर्जन्म भारतात किंवा इतर देशात झाला, तर जागतिक बौद्ध नेतृत्व भारताकडे वळण्याची भीती चीनला आहे.
 
भारताचे चीनच्या दाव्याला प्रत्युत्तर 
 
’गॅडन फोडरंग ट्रस्ट’ ही संस्था दलाई लामांच्या भविष्यातील पुनर्जन्माला मान्यता देणारी एकमेव अधिकृत संस्था आहे. दलाई लामांच्या अनुयायांचा असा विश्वास आहे की, हा अवतार केवळ स्थापित परंपरेनुसार आणि दलाई लामांच्या इच्छेनुसारच ठरवला जातो. दलाई लामांच्या उत्तराधिकारी निवडीचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ दलाई लामा आणि त्यांच्या धार्मिक परंपरेलाच आहे.यामध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही, असे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी चीनला सुनावले. 

Related Articles