रशियासोबत व्यापार करणार्‍या देशांवर अमेरिका लादणार ५०० टक्के कर   

भारतासाठी धोक्याचा इशारा 

वॉशिंग्टन : रशियासोबत व्यापार करणार्‍या देशांबाबत अमेरिकेने कडक भूमिका घेतली आहे. रशियाच्या युक्रेनविरुद्धच्या युद्धाला तीन वर्षे उलटूनही, काही देश, विशेषतः भारत आणि चीन, अजूनही रशियाकडून तेल खरेदी करत आहेत. यानंतर आता अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी एक विधेयक मांडले आहे. यात रशियासोबत व्यापार करणार्‍या देशांवर ५०० टक्के कर लादण्याबद्दल सांगण्यात आले आहे. या विधेयकाला अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा आहे.
 
यामुळे भारतासह अनेक देशांसाठी ही धोक्याची घंटा आहे. जे देश रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करत आहेत. त्या देशांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. या विधेयकाबाबत बोलताना ग्राहम म्हणाले, ट्रम्प यांनी जुलैनंतर हे विधेयक मतदानासाठी आणण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. हे विधेयक रशियाच्या युद्ध यंत्रणेला कमकुवत करण्यासाठी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेन मुद्द्यांवर वाटाघाटीच्या टेबलावर आणण्यासाठी एक शस्त्र आहे.

काय आहे या विधेयकात?

या विधेयकात रशियाकडून तेल आणि इतर वस्तू खरेदी करणार्‍या देशांवर, विशेषतः भारत आणि चीनवर मोठ्या प्रमाणात कर लादण्याबद्दल मांडण्यात आले आहे. भारत आणि चीन रशियाचे ७० टक्के तेल खरेदी करतात. या विधेयकाद्वारे अमेरिका या देशांवर दबाव आणण्याची शक्यता आहे, जेणेकरून ते रशियासोबतचा व्यापार थांबवतील, असे सिनेटर ग्राहम यांनी सांगितले.
 
या विधेयकाला ८४ सिनेटरचा पाठिंबा आहे. हे विधेयक मार्चमध्ये मांडण्यात आले होते, परंतु व्हाईट हाऊसच्या आक्षेपांमुळे आणि ट्रम्प-पुतिन संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांमुळे ते मागे घेण्यात आले. आता मात्र, ट्रम्प सरकार या विधेयकाला पाठिंबा देण्यास तयार आहे, असेही ग्राहम म्हणाले. 

भारतासाठी धोक्याची घंटा?

रशिया-युक्रेन युद्धाच्या सुरुवातीला अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर व्यापारी निर्बंध लादले. यासोबतच, रशियासोबत जागतिक व्यापारावरही बंदी घालण्यात आली. यामुळे रशियाला इतर कोणाशीही व्यापार करणे कठीण झाले. त्यानंतर भारताने रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करण्यास सुरुवात केली. यासाठी दोन्ही देशांनी डॉलरऐवजी रुपया-रुबल प्रणालीद्वारे व्यापार केला जात आहे. परिणामी, भारताच्या एकूण तेल आयातीमध्ये रशियाचा वाटा एक टक्क्यांवरून ४० ते ४४ टक्क्यांपर्यंत वाढला. 
 
जूनमध्ये, भारताने रशियाकडून दररोज २० लाखांपेक्षा बॅरल तेल आयात करण्याची योजना आखली, जी गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक आहे. पण जर हे विधेयक मंजूर झाले, आणि ५०० टक्के कर लादला गेला, तर भारतातून अमेरिकेत आयात होणार्‍या वस्तूंवर मोठा कर लादला जाईल. मात्र, भारत आणि अमेरिका यांच्यात एक व्यापार करार होण्याच्या प्रक्रियेत असून, ज्यामुळे शुल्क कमी होऊ शकते. तरीसुद्धा, या विधेयकाचा भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम होऊ शकतो.

आम्ही सिनेटर ग्राहम यांच्या संपर्कात : जयशंकर 

अमेरिकेने रशियन तेल आयातीवर ५०० टक्के कर लादण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर म्हणाले, आम्ही सिनेटर लिंडसे ग्राहम यांच्या संपर्कात आहोत. त्यांना आमच्या चिंता आणि ऊर्जा, सुरक्षेबाबतच्या आमच्या हितसंबंधांची जाणीव करून देण्यात आली आहे. 
 

Related Articles