अमली पदार्थांच्या चोरट्या आयातीसाठी रुग्णांचा वापर   

सरकारपुढे आव्हान

विजय चव्हाण

मुंबई : युवा पिढीसह राज्याला बसलेला अमली पदार्थांचा विळखा तोडून टाकण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत असले तरी अमली पदार्थाच्या चोरट्या आयातीत आता शेवटच्या टप्प्यात असलेल्या कर्करोग रुग्णांचा वापर करण्यात येत आहे, अशी धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधान परिषदेत दिली.  
 
राज्यात मागील पाच वर्षांत ५१५१.५८६ किलो वजनाचा अंदाजे ९५२२.२१ कोटींचा मॅड्रोन (एमडी) व त्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त करण्यात आला असून एकूण ११६ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती देतानाच, अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात होणार्‍या आयातीला आळा घालण्यासाठी  त्यांच्यावर मकोका लावण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच विधान परिषदेत केल्यांनंतर काल त्यांनी अमली पदार्थाच्या वापराचे मुळापासूनच उच्चाटन करण्यासाठी काय उपाय योजना चालल्या आहेत याची माहिती दिली.
 
देशभरात अमली पदार्थाचा व्यापार वाढला असून मुंबई, वसईसह राज्यभर त्याचे जाळे पसरले आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने बनवल्या जाणार्‍या हायड्रो गांजाचे आव्हानही आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे. अमली पदार्थ प्रकरणात सर्वाधिक छापे हे महाराष्ट्रात पडले असून सर्वाधिक आरोपीही महाराष्ट्रात सापडल्याबद्दल विरोधकांनी चिंता व्यक्त केली.
 

Related Articles