कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा   

मराठवाड्यातही पाऊस कायम 

पुणे : राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. आज (शुक्रवारी) कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट विभाग आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही पावसाचे सातत्य कायम असणार आहे. 
 
वार्‍याची द्रोणीय रेषा महाराष्ट्राच्या समुद्र किनार्‍यापासून कर्नाटकच्या समुद्र किनार्‍यापर्यंत जात आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र व विदर्भात बर्‍याच, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकणास, सातारा, कोल्हापूर आणि पुण्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 
 
दरम्यान, पुण्यात काल सकाळपासून ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे पुणेकरांना खबरदारी घेवून घराबाहेर पडावे लागले. पाऊस आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावल्याने शहर आणि उपनगरात वाहतूक कोंडी झाली होती. दुपारपासून सायंकाळपर्यंत थांबून थांबून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. पुणे व परिसरात पुढील चार दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच घाट विभागात मुसळधार ते अतिमुसळणार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.

धरण क्षेत्रात २४ तासांत पडलेला पाऊस 

धरण पाऊस टीएमसी टक्केवारी
खडकवासला  २३ मिमी १.२८ ६४.७५
पानशेत ७३ मिमी ५.९२ ५५.५५
वरसगाव ७८ मिमी ७.९० ६१.६३
टेमघर १०५ मिमी १.६९ ४५.५०
एकूण २७९ मिमी १६.७८ ५७.५७
मागील वर्षी -- ४.७२ १६.१९

 

 

Related Articles