बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना अर्थसाहाय्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी   

साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांचा पुढाकार

पुणे : बृहन्महाराष्ट्रातील मराठी संस्थांना अर्थसाहाय्य मिळावे आणि मराठी भाषा पंधरवडा कालावधी बदलण्यात यावा, यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे  अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले उपस्थित होते.
 
प्रा. जोशी म्हणाले, महाराष्ट्र राज्याने २०१० मध्ये स्वीकारलेल्या सांस्कृतिक धोरणातील प्रकरण ४ ’भाषा आणि साहित्य’ या अंतर्गत बृहन्महाराष्ट्र या विभागात बृहन्महाराष्ट्रातील मंडळांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसाहाय्य योजना राबवण्यात येत होती. परंतु २०२३ पासून ती बंद आहे. हा बृहन्महाराष्ट्रातील मराठी बांधव आणि संस्थांवर अन्याय आहे. जिथे मराठी भाषा राज्याची आणि संवादाची मुख्य भाषा नाही तिथे आपली भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी ही योजना तातडीने सुरू करावी.
 
महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांत मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्रीय संस्कृती यासंदर्भात कार्य करणार्‍या मान्यताप्राप्त संस्थांना तसेच महाराष्ट्राबाहेर मराठी ग्रंथ प्रकाशनाचे दर्जेदार कार्य करणार्‍या संस्थांना अर्थसाहाय्य देण्यात येत होते. ते अनुदान सुरू करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रतिवर्षी जानेवारी महिन्यात मराठी भाषा पंधरवडा साजरा करा व त्या निमित्ताने विविध भाषा विषयक कार्यक्रम घ्या असे निवेदन महाराष्ट्रातील सर्व साहित्य संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये यांना पाठवले जाते व त्यानुसार कार्यक्रम घेतले जातात. हा मराठी भाषा पंधरवडा २७ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत साजरा केला पाहिजे कारण २७ फेब्रुवारी हा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आहे, तर १४ मार्च हा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर यांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या स्मृतींचा जागर हे औचित्य मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यासाठी अधिक योग्य आहे. त्याचा गांभीर्याने विचार करून यापुढे मराठी भाषा पंधरवडा २७ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत साजरा केला जावा. याबाबतचा ठरावही दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात करण्यात आला होता, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याप्रश्नी प्राधान्याने लक्ष घालून २०२६ पासून मराठी भाषा पंधरवडा २७ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत साजरा केला जावा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. असेही प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.
 

Related Articles