राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणार्‍यास चोप   

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या व्यक्तीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आक्रमक मनसेच्या कार्यकत्यांकडून या व्यक्तीची सुटका केली. कोथरूड येथील इंद्रधनु सोसायटीमध्ये हा प्रकार घडला.
 
केदार सोमण नावाच्या व्यक्तीने राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट समाजमाध्यमांवर टाकली होती. त्यामुळे मनसेचे प्रवक्ते हेमंत संभूस हे कार्यकर्त्यांसह केदार सोमण यांच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले होते. त्याच वेळी पोलिसदेखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना सोसायटी बाहेर काढले. त्यानंतर केदार सोमण यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जात असताना मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले.
 
समाजमाध्यमावर केदार सोमण या नावाच्या व्यक्तीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याची बाब समोर आली. त्यानंतर आम्ही या व्यक्तीचा शोध घेतल्यावर सुरुवातीला तो ठाणे येथील असल्याचे समजले, पण, त्यानंतर पुण्यातील कोथरूड भागात राहण्यास असल्याचे स्पष्ट झाले. 
 
त्यामुळे या प्रकरणी आम्ही केदार सोमण या नावाच्या व्यक्तीला चोप देण्यासाठी आलो होतो. मात्र, पोलिस आल्याने तो वाचला, अशी प्रतिक्रीया मनसेचे प्रवक्ते हेमंत संभूस यांनी दिली.
 

Related Articles