कपड्यांपेक्षा मद्य, शीतपेयांवर जास्त खर्च   

वृत्तवेध 

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने एक अहवाल तयार केला आहे. त्यात देशातील सामान्य माणूस दैनंदिन जीवनात कोणत्या गोष्टींवर जास्त खर्च करत आहे आणि कोणत्या गोष्टींवर तो कमी खरेदी करत आहे, हे उघड केले आहे. देशातील सामान्य उत्पन्न गटातील लोक कपड्यांपेक्षा अल्कोहोल आणि कोल्ड्रिंक्सवर जास्त खर्च करत आहेत. लोक कपड्यांपेक्षा अल्कोहोलवर जास्त खर्च करत आहेत.
 
अहवालात म्हटले आहे की २०२३-२४ मध्ये लोकांनी आपल्या उत्पन्नापैकी ७.२९ लाख कोटी रुपये कपड्यांवर खर्च केले. त्याच वेळी १.२० लाख कोटी रुपये मद्यावर खर्च केले. एक वर्षापूर्वी, म्हणजेच २०२२-२३ मध्ये लोकांनी कपड्यांवर ७.६० लाख कोटी रुपये खर्च केले. त्याच वेळी, अल्कोहोलवर ०.९५ लाख कोटी रुपये खर्च केले गेले. यावरून स्पष्ट होते, की या वर्षात कपड्यांवरील खर्च कमी झाला आहे, तर अल्कोहोलवरील खर्च २६ टक्क्यांनी वाढला आहे. २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये लोकांचा वाहन खरेदीवरील खर्चही वाढला आहे. एक वर्षापूर्वी हा खर्च २.६४ लाख कोटी रुपये होता. एका वर्षानंतर तो ३.२६ लाख कोटी रुपये झाला.
 
वाहतूक सेवेवरील खर्च २०२२-२३ मधील १४.३२ लाख कोटी रुपयांवरून २०२३-२४ मध्ये १५.५० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला. म्हणजेच स्वतःचे वाहन खरेदी करण्याचा खर्च सार्वजनिक वाहतुकीवरील खर्चाच्या तिप्पट वाढला आहे. एका वर्षात आरोग्यावरील खर्चात इतकी वाढ झाली आहे की लोक हळूहळू आपल्या आरोग्याबद्दल जागरूक होत आहेत. कारण या काळात आरोग्यावरील खर्चात १८.७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा खर्च २०२२-२३ मध्ये ८.४८ लाख रुपयांच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये १०.०७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तथापि, विमा प्रीमियमवरील खर्च ३.३९ टक्क्यांनी कमी झाला आहे. २०२२-२३ मध्ये लोकांनी भरलेल्या प्रीमियमची रक्कम १.७७ लाख कोटी रुपये होती. २०२३-२४ मध्ये ती कमी होऊन १.७१ लाख कोटी रुपयांवर आली आहे. या काळात मनोरंजनावरील खर्चातही १.३८ टक्क्यांनी घट झाली. परंतु इंटरनेट आणि कॉलवरील खर्चात आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२३-२४ मध्ये अन्नपदार्थांवरील खर्चाचा वाटा २८ टक्के म्हणजेच ५,१५ लाख कोटी रुपये होता. तो गेल्या वर्षीपेक्षा ८.६ टक्के जास्त आहे. वाढती महागाई हे यामागील कारण असू शकते. भाज्यांपासून फळे, धान्य-डाळी, दूध, अंडी, साखर, जाम या वस्तूंवरील खर्च गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे.

Related Articles